पुणे-सीमकार्ड वापराची माहिती अद्ययावत करण्याची बतावणी करून चोरट्याने महिलेच्या बॅंक खात्यातून 10 लाख 85 हजारांची रोकड लांबवली. याबाबत महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
भारत संचार निगम लिमिटेडमधील (बीएसएनएल) अधिकारी बोलत असल्याची बतावणी करणाऱ्या चोरट्याने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता.
चोरट्याने समाजमाध्यमातून महिलेला संदेश पाठविला होता. समाजमाध्यमातील डीपीवर चोरट्याने बीएसएनएलचे बोधचिन्ह ठेवले होते. त्यामुळे महिलेने त्याच्यावर विश्वास ठेवला. मोबाइल सीमकार्डची मुदत संपली आहे.
सीमकार्ड वापराची माहिती अद्ययावत करावी लागेल. माहिती अद्ययावत न केल्यास सीमकार्ड बंद पडेल, अशी बतावणी चोरट्याने महिलेकडे केली. त्यानंतर चोरट्याने महिलेच्या डेबिट कार्ड तसेच बॅंक खात्याची गोपनीय माहिती घेतली. महिलेचा मोबाइल क्रमांक बॅंक खात्याला जोडला होता.