पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या वतीने प्रवाशांच्या समस्या, तक्रारी आणि सूचना थेट प्रवाशांकडून जाणून घेण्यासाठी “प्रवासी दिना’चे आयोजन करण्यात आले होते. पहिल्यावहिल्या प्रवासी दिनाला 13 डेपोंमध्ये 14 सूचना, तक्रारी पीएमपीकडे करण्यात आल्या.
यामध्ये शहरात आणि पिंपरी-चिंचवड परिसरात पीएमपीएमएलचे 13 डेपो आहेत. सद्यस्थितीत रोज सुमारे दहा लाखांपेक्षा अधिक प्रवासी पीएमपीएमएल बसने प्रवास करतात. प्रवासादरम्यान प्रवाशांना काही समस्या जाणवतात. ज्या परिसरातून प्रवासी येतात, अशा ठिकाणी बसथांबा व्यवस्थित नसणे, गाड्यांची संख्या कमी असणे, थांब्यावर गाडी न थांबणे, चालक-वाहकाचे उद्धट वर्तन, विशिष्ट मार्गावर गाडीचे सातत्याने ब्रेकडाऊन होणे अशा अनेक समस्या जाणवतात. याबाबत थेट प्रवाशांचे म्हणणे जाणून घेण्यासाठी प्रवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
2014 मध्ये हा उपक्रम पीएमपीएमएलने सुरू केला होता. तो अवघ्या 2 वर्षांतच बंद पडल्याने 2016 मध्ये पुन्हा सुरू करण्यात आला. तर 2017 मध्ये पुन्हा हा बंद पडला. त्यानंतर आता 2019 पासून तो पुन्हा सुरू करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार दि. 1 जून रोजी पहिला प्रवासी दिन पार पडला. यावेळी प्रवाशांनी पीएमपीच्या मुख्यालयातील अधिकारी आणि डेपो मॅनेजर यांच्याशी संवाद साधला. यामध्ये प्रवाशांनी पीएमपी प्रशासनाकडे तक्रारी आणि समस्यांचे गाऱ्हाणे मांडले. तर सूचना देखील सांगितल्या.
प्रवाशांनी केल्या प्रमुख सूचना
बसेसच्या वेळा निश्चित करणे
बसेस वेळेवर सोडण्यात याव्यात
बसेसचे ब्रेकडाऊन कमी करावे
पुणे स्टेशन, कोथरुड परिसरामध्ये बसेसची संख्या वाढवावी
तेजस्विनी बसेसची संख्या वाढवावी.