पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्यामुळे दोन्हही गटाच्यावतीने पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचे पाहायला मिळते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट ) पुणे शहर उपाध्यक्ष पदी पुंडलिक लव्हे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहराचे अध्यक्ष प्रशांत जगताप, खासदार सुप्रियाताई सुळे व माजी आमदार कमलताई ढोले पाटील यांनी त्यांची निवड केली आहे.
पुंडलिक लव्हे हे वडगांवशेरी, खराडी-चंदननगर येथे पक्षाच्या कामात अग्रेसर आहेत. लव्हे यांनी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (२००२ – २००७) पक्ष प्रवक्ते पदाची जबाबदारी देखील सांभाळलेली आहे.गेली १० वर्ष ते शहर कार्यकारीणीवर चिटणीस या पदावर कार्यरत आहेत.पक्षाशी एकनिष्ठता आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांमधला जनसंपर्क यामुळे त्यांच्यावर आता शहर उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
संत शिरोमणी सावता महाराज प्रतिष्ठानच्या माध्यमातून सावतामाळी मंदिर व महात्मा फुले होस्टेलची उभारणी त्यांनी केली आहे. तसेच सावता माळी मंदिर गणेशनगर येथे सप्टेंबर अखेर २५७ कीर्तनाचे आयोजन देखील त्यांनी केले होते. लव्हे हे शरद पवार यांच्या १९६७ च्या पहिल्या निवडणूकी पासून ते आजपर्यंत त्यांचे प्रचारक आहेत. बारामती तालुक्यातील बाबुर्डी हे त्यांचे मुळ गांव असून १९७५ पासून वडगांवशेरी येथे ते कार्यरत आहेत.
आचार्य अत्रे यांच्या विषयीची आचार्य अत्रे विनोद आणि आठवणी, आचार्य अत्रे झेप आणि झुंज तसेच आचार्य अत्रे गमती आणि जमती ही पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. आगामी काळात पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी आणि अधिकाधिकी तरुणांना राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे लव्हे यांनी सांगितले. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार धारेशी एकरूप राहून यशवंतराव चव्हाण, शरद पवार, लोकतेने बाळासाहेब दोलाई व क्रांतिसिंह नाना पाटील यांना अराध्य स्थानी मानून पक्ष श्रेष्ठींनी ठेवलेला विश्वास सार्थ ठरवून दाखवेल असं देखील लव्हे यांनी यावेळी म्हंटले.