कोपरगाव -जगात करोना विषाणूने थैमान घातले असून, सर्व काही ठप्प आहे. अशा परिस्थितीत कोपरगाव विधानसभा मतदारसंघात आ. आशुतोष काळे यांनी करोनाशी लढा देत तालुका करोनामुक्त ठेवला आहे. त्याचबरोबर विकासकामे देखील सुरू केली आहेत. पुणतांबा फाटा ते झगडे फाटा रस्त्याच्या कामाच्या कामाचा नुकताच त्यांना प्रारंभ केला.
दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वाचा असणारा कोपरगाव विधानसभा मतदार संघातील पुणतांबा फाटा ते झगडे फाटा हा रस्ता अत्यंत खराब झाला होता. तसेच सण-उत्सव काळात शिर्डी शहरातील वाहतुकीचा भार कमी करण्यासाठी या रस्त्याचा सातत्याने उपयोग करण्यात येत असल्यामुळे त्याची अवस्था अधिकच वाईट झाली होती. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच लहान-मोठे अपघात होत होते. या मार्गावर असलेल्या गावांतील ग्रामस्थांनी रस्ता दुरुस्तीबाबत आ. काळे यांना साकडे घातले होते. त्याबाबत आ. काळे यांनी पाठपुरावा करून सात किलोमीटर रस्त्यासाठी केंद्र शासनाकडून 7.50 कोटी रुपये निधी मंजूर करून आणला होता. करोनामुळे लॉकडाऊन झाल्याने सर्व कामे बंद होती.
मात्र त्यात काही अंशी सूट दिल्याने आ. काळे यांनी या कामास नुकताच प्रारंभ केला. करोनाशी लढताना आ. काळे यांनी विकासकामेही सुरू ठेवल्याचेच यावरून दाखवून दिले. माजी आमदार अशोकराव काळे यांनी त्यांच्या कार्यकाळात तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांबरोबर या रस्त्याने प्रवास करून त्याच्या दयनिय अवस्थेची परिस्थिती जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिली होती.
त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने या रस्त्यासाठी निधी मंजूर करून रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. मागील पाच वर्षांत या रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष झाल्यामुळे पुन्हा आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्यासाठी प्रयत्न करून 7.50 कोटी रुपये निधी मिळविला. तसेच मोजक्याच कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत सोशल डिस्टन्सिंग पाळून कामास आज प्रारंभ केला. या रस्त्याचे काम सुरू झाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.