कांद्याच्या दरासाठी चक्‍क ट्विटरद्वारे आंदोलन

पुणे – लॉकडाऊन असल्याने सध्या बाजार समित्या बंद असून कांद्याला प्रतिकिलो 5 रुपये दर मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादन खर्चही वसूल करणे अवघड झाले आहे. या परिस्थितीत कांदा उत्पादकांना दिलासा देण्यासाठी केंद्राने प्रति 20 रुपये किलोप्रमाणे खरेदी करावा या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने ट्विटरच्या माध्यमातून आंदोलन छेडले आहे.

सध्या जमावबंदी असल्याने थेट रस्त्यावर उतरणे व आंदोलन करण्यास अडचणी आहेत. त्यामुळे कांदा उत्पादकांनी आंदोलनाची स्मार्टपद्धत अवलंबून सरकारचे याकडे लक्ष वेधले जाणार आहे. यापूर्वी संघटनेने निर्यात खुली करण्याबाबत अशा पद्धतीने आंदोलन केले होते. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर, अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांना लक्ष्य केले जात आहे.

मागील वर्षाच्या खरीप हंगामापासून कांदा उत्पादक अडचणीत आहेत. खरिपाच्या तोंडावर हातात भांडवल नसल्याने कांदा विक्रीसाठी आणला जात आहे, मात्र त्यातून उत्पादन खर्चही वसूल होत नाही. बाजार समित्याही बहुतांशी बंद आहेत. अशा स्थितीत राज्यातील कांदा उत्पादकांनी कांदा विक्री कसा करायचा याबाबत मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे या विषयावरही लक्ष द्या, ही भूमिका घेऊन हे आंदोलन करण्यात येत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.