पिंपरी – पुठ्ठ्याच्या कंपनीला लागलेली आग अडीच तासांनंतर आटोक्यात आटोक्यात आली. ही घटना सोनावणे वस्ती, चिखली येथे घडली.
अग्निशामक दलाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी 2.34 वाजताच्या सुमारास विकास अनाथ आश्रमजवळ, सोनावणे वस्ती, चिखली येथे आग लागल्याची वर्दी अग्निशामक दलास मिळाली. त्यानुसार पिंपरी येथील मुख्य अग्निशामक केंद्रातील दोन बंब, तसेच चिखली, तळवडे, भोसरी, प्राधिकरण, थेरगाव येथील अग्निशामक उपकेंद्रातील प्रत्येक एक बंब घटनास्थळी दाखल झाला.
आगीचे उग्र रूप पाहता टाटा मोटर्स, चाकण एमआयडीसी, फोर्स मोटर्स, महेंद्र कंपनी (चाकण) यांना देखील आग शमविण्यासाठी मदतीकरिता बोलविण्यात आले. याशिवाय पाण्याचा पुरवठा करण्यासाठी खासगी टॅंकरचीही मदत घेण्यात आली. तब्बल अडीच तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशामक दलास यश आले. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. तसेच आगीचे कारणही समजू शकले नाही.
गेल्या आठवड्यात दोन दिवसांत 13 आगीच्या घटना घडल्या होत्या. यापैकी मोशी कचरा डेपोला लागलेली आग आणि मोशी येथील केमिकलचे ड्रम ठेवण्यात येणाऱ्या कंपनीला आग या दोन मोठ्या घटना होत्या. त्यानंतर सोमवारी चिखली येथे पुठ्ठ्याच्या कंपनीला लागलेली आगही मोठी होती.