पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने पुणे जिल्हा निवडणूक प्रशासनातर्फे तयार करण्यात आलेल्या निवडणूक पूर्वपीठिकेचे प्रकाशन प्रधान सचिव तथा राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांच्या हस्ते यशदा येथे करण्यात आले.
या वेळी केंद्रीय निवडणूक आयोगाचे स्वीप संचालक संतोष अजमेरा, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे, आयोगाच्या वरीष्ठ स्वीप सल्लागार अनुराधा शर्मा, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मीनल कळसकर आदी उपस्थित होते.
पुणे जिल्हा माहिती कार्यालयाने वृत्तपत्रे, इलेक्ट्रॉनिक माध्यमे आदी प्रसिद्धी माध्यमांसाठी उपयुक्त संदर्भ असलेल्या या पुस्तिकेची निर्मिती केली आहे. निवडणूक आचारसंहितेबाबत तरतुदी, निवडणूक वार्तांकनासाठी प्रेस कौन्सिलची मार्गदर्शक तत्त्वे, न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल स्टँडर्डस् ऑथॉरिटीच्या (एनबीडीएसए) मार्गदर्शक सूचना, इंटरनेट अँड मोबाईल असोसिएशन ऑफ इंडियाची (आयएमएआय) स्वैच्छिक आचारसंहिता आदींबाबत सविस्तर माहिती या पुस्तिकेत दिली आहे.
२०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीतील महाराष्ट्राची मतदानाबाबतच्या ठळक बाबी, तसेच पुणे जिल्ह्यातील निवडणुकीची ठळक वैशिष्ट्ये यांचाही पुस्तिकेत समावेश आहे. सन १९५१ च्या निवडणुकीपासून २०१९ च्या निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातील लोकसभा मतदारसंघातील उमेदवार, त्यांना झालेले मतदान, मतदार संख्या, वैध मतांची संख्या, मतदानाची टक्केवारी याची माहिती पुस्तिकेत समाविष्ट असल्याने ही पुस्तिका माध्यम प्रतिनिधींना संदर्भासाठी उपयुक्त आहे.