आळंदी – श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने करोनाच्या कालावधीत सामाजिक दायित्व म्हणून सलग “156 दिवस’ आळंदी व आळंदी पंचक्रोशीत गरजूंना अन्न वाटपाचे काम केले होते. तसेच दीड – दोन महिने गरजूंना निवारा केंद्रही उपलब्ध करून दिले होते. याच काळातील वास्तववादी उपलब्ध माहिती व फोटो आदी च्या साह्याने “इंद्रायणी काठी 156′ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
पंकजमहाराज गावडे, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व दि कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे सचिव अजित वडगावकर, विश्वस्त लक्ष्मण घुंडरे, प्रकाश काळे, संस्था सदस्य अनिल वडगावकर, रेणूकादास पांचाळ, शाम पवार, श्रीधर सरनाईक, मुक्ताजीमहाराज नाणेकर, प्राचार्य दीपक मुंगसे आदी उपस्थित होते. तसेच प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते ह.भ.प. पंकज महाराज गावडे यांनी अध्यात्म व समाजसेवा या विषयावर व्याख्यानाचे पुष्प गुंफले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप काळे यांनी तर सूत्रसंचालन योगेश मठपती यांनी केले.