पटना – बिहारमध्ये दररोज पोलिस अधिकाऱ्यांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. असाच ट्रॅफिक जवानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, त्यात तो पोलिस पावती न कापण्यासाठी खुलेआम लाच मागत आहे.
हे प्रकरण बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील आहे. सरैय्यागंज टॉवर चौकात तैनात असलेल्या वाहतूक जवानाने चुकीच्या दिशेने येणाऱ्या कारला थांबवून गाडीचे कागदपत्र दाखवण्यास सांगितले, मात्र वाहनात बसलेल्या चालकाने सोबत कागदपत्र नसल्याचे सांगून असमर्थता व्यक्त केली. त्यानंतर वाहतूक जवानाने पावती न करण्यासाठी कार चालकाकडून 200 रुपये लाच मागितली. कार चालक आणि वाहतूक जवान यांच्यातील या संभाषणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये, कारचालक वाहतूक जवानाला 100 रुपयांची लाच देतो, मात्र तो जवान 200 रुपयेच पाहिजेत अन्यथा वरिष्ठ अधिकाऱ्याला बोलावले जाईल मग तुम्हाला पावती करावी लागेल असे म्हणून 200 रुपये द्या सुट्टे नसतील तर मी देतो असे जवान म्हणत असल्याचे दिसते.
उघडपणे लाच घेतल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतल्यानंतर अधिकारी गौतम कुमार यांनी सांगितले की, लाच घेणाऱ्या जवानाची ओळख पटली आहे. जमाल असे त्याचे नाव असून तो मुझफ्फरपूरच्या सरैयागंज चौकात तैनात आहे. पोलीस प्रशासन हा प्रकार खपवून घेणार नाही आणि हवालदारावर कडक कारवाई केली जाईल, ज्यामुळे असा संदेश इतरांनाही जाईल आणि कोणीही लाच मागताना 100 वेळा विचार करेल.
याआधीही एप्रिलमध्ये बिहारमधील बक्सर पोलिस स्टेशनचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये पासपोर्ट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली पोलिस ठाण्यात बसलेला एक लेखक तेथे आलेल्या एका व्यक्तीकडून लाच मागत होता. व्हिडिओमध्ये लेखक सांगत होता की, पोलीस ठाण्यात कोणतेही काम 699 चे रिचार्ज केल्यानंतरच होते. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बक्सरच्या एसपींनी चौकशी करण्याचे आदेश दिले होते.