मानसोपचार: मोबाईल आणि वाढती आत्महत्या

काल, परवा पेपरमध्ये एक बातमी वाचली आणि धक्काच बसला. मोबाईलवरच्या कुठल्याशा एका खेळात हरली म्हणून एका तरुण मुलीने आत्महत्या केली. गळफास लावून घेतला. डोकं सुन्न झालं. काय होतं असं त्या खेळात? का तो खेळ तिला इतकं वेड लावून गेला? त्या खेळात हरली म्हणून गळफास लावून घेताना एकदाही तिला तिच्या घरच्यांची, जोडीदाराची काळजी नाही वाटली? या सर्वांपेक्षा तो खेळ खरंच एवढा महत्त्वाचा होता? खरंच कुठे चाललाय आपला हा समाज ही तरुणाई?
आजच्या काळात अन्न, वस्त्र, निवारा याचबरोबर मोबाईल ही प्रत्येकाची प्राथमिक गरजच झालीये.

आपल्याकडे मोबाईल नाही म्हणजे आपण जगूच शकत नाही असं आता प्रत्येकाला वाटायला लागलंय. अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या कोताऱ्यांपर्यंत प्रत्येकाकडे मोबाईल पाहायला मिळतोच. अहो म्हातारे कोतारे काय पण अगदी घरकाम करणाऱ्या बायका, मजुरी काम करणारे यांच्याकडेही मोबाईल हा असतोच. खरंच काय आहे हो हा मोबाईल नावाचा राक्षस? ज्याने सगळ्यांना गिळून टाकलंय!

पूर्वी कुठे होते मोबाईल आपल्या लहान वयात कुठे वापरलेत आपण मोबाईल? पण म्हणून आपलं काही अडलं का? आपलं आयुष्य थांबलं का? कोणत्यातरी खेळात मित्रांबरोबर खेळताना आपण हरलो म्हणून आपल्याला आत्महत्या करावीशी वाटली का? भांडलो, चिडलो, रडलो, फारतर रुसून मी नाही खेळणार असं म्हणालो आणि दुसऱ्या दिवसी परत येऊन दुप्पट वेगाने, त्वेषाने मजेत खेळलो.

पण आज एका साध्या मोबाईलवरच्या खेळ हरली म्हणून तिला म्हणजे एका म्हणजे एका सूज्ञ सुशिक्षित तरुण मुलीला स्वतःचं आयुष्य त्या खेळापुढे मातीमोल किमतीचं वाटलं? म्हणून तिने आत्महत्या केली? पुढचा-मागचा कोणताही विचार तिच्या मनात आला नाही? असं का झालं?

असं झालं कारण ती मोबाईल नावाच्या एका यंत्राच्या आहारी गेली. त्या मोबाईलचं तिला व्यसन लागतं. सुरुवातीला एकदाच, थोडाचवेळ असं म्हणत म्हणत ती त्या मोबाईलच्या व्यसनाच्या विळख्यात कशी गुरफटत गेली ते तिचं तिलाही कळलं नाही. हे मोबाईल नावाचं जगर असंच सर्वांना गिळू पाहतंय. मध्यंतरी अशाच एका ब्लू व्हेल नावाच्या माणसानं अनेक निष्पापांचे बळी घेतले होते. मित्रहो आता दारू, तंबाखू, गुटखा ही व्यसनं मागे पडत चाललीयत. ही व्यसन सोडवणारी जशी व्यसनमुक्ती केंद्र आहेत.

तशीच आता मोबाईल, इंटरनेटचं व्यसन सोडवणारी व्यसनमुक्ती केंद्र दुर्दैवाने सुरू करावी लागत आहेत आणि त्यात भरती होणाऱ्या तरुण-तरुणींची संख्याही दिवसेंदिवस वाढत चाललीये. मोबाईल मिळाला नाही तर ही लोक अस्वस्थ, आक्रमक होतायत. त्यांच्या आयुष्यातली उंच भरारी घेण्याची वर्ष ते या व्यसनमुक्ती केंद्रात वाया घालवतायत.

काय करावं यासाठी? समजा फेसबुक, इंस्ट्रग्राम, व्हॉटस ऍप वर नाही मिळाले आपल्याला खूप सारे लाईक्‌स तर काय बिघडलं? एखाद्या संकटात अडलेल्या माणसाचा, पक्षाचा, प्राण्याचा व्हिडिओ मिडियावर वायरल न करता त्याला मदत करायला धावलात तर काय हरकत? समजावर, एखाद्या माणसावर एखाद्या प्रसंगावर टीका-टिपण्णी करणारे एसएमएस फॉरवर्ड न करता डिलीट केलेत तर काय हरकत आहे? हेच खरं तर माणुसकीला धरून नाही का? आपल्यावर याच माणुसकीचे संस्कार लहानपणापासून होत आलेत ना? मग आता हे कुठे गेले?

मित्र-मैत्रिणींनो यावर बोलण्यासारखं, सांगण्यासारखं खूप काही आहे. पण “सूज्ञास अधिक सांगणे न लगे’ मोबाईल हा आजच्या काळात खरंच खूप उपयुक्त आणि गरजेचा आहे. आपली हजारो कामं या मोबाईल, कॉम्प्युटरमुळे चुटकीसरशी होतात. त्यासाठी पूर्वीसारखं अडकून राहावं लागत नाही हे मान्यच आहे. पण म्हणून त्याच्या किती आहारी जायचं? की त्याचा वापर मर्यादित ठेवायचा? का
स्वतःला व्यसनमुक्ती केंद्रात ऍडमिट करून घ्यायचं किंवा डोळ्याच्या आजारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हायचं हे सर्वांनीच ठरवलं पाहिजे.

मोबाईलवर सर्वांनी मर्यादा घातलीच पाहिजे मोबाईल आपल्यासाठी आहे. आपण मोबाईलसाठी नाही हे लक्षात घेऊन त्याचं वेडं कमी करायलाच हवं. तरच आपण स्वतःला आत्महत्या, व्यसनमुक्ती केंद्रापासून दूर ठेवू शकू. समुपदेशक म्हणून जे सांगवंसं वाटलं ते तळमळीने सांगितलं. आता निर्णय
मात्र तुमचा!

– मानसी तांबे चांदोरीकर

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.