- शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांची आयुक्तांकडे मागणी
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने थेरगाव येथे उभारण्यात येत असलेल्या रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात असून या ठिकाणी शहरातील कॅन्सरने पीडित नागरिकांसाठी सुसज्ज व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात, अशी मागणी शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे.
याबाबत कलाटे यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, थेरगाव येथील रुग्णालयाचे काम अंतिम टप्प्यात आहे. शहरात इतर आजारांसाठी महापालिकेची अनेक रुग्णालये उपलब्ध आहेत. मात्र सुसज्ज आणि अत्याधुनिक कॅन्सर रुग्णालय उपलब्ध नाही. गेल्या अनेक वर्षांपासून कॅन्सर रुग्णालय उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे मात्र तो प्रत्यक्षात उतरलेला नाही.
थेरगाव रुग्णालय आणि शहरातील नागरिकांची गरज लक्षात घेऊन या ठिकाणी कॅन्सर ग्रस्तांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारावे तसेच हे रुग्णालय कॅन्सर ग्रस्तांसाठी अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या टाटा सायन्स आणि टेक्नॉलॉजी या सेवाभावी संस्थेला चालविण्यासाठी देण्यात यावे. महापालिकेची सुविधा आणि टाटा संस्थेची सेवाभावी वृत्ती लक्षात घेता या शहरातील नागरिकांना एक चांगला पर्याय उपलब्ध होईल व महापालिकेचा उद्देशही सफल होईल. या बाबींचा विचार करून तात्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणीही कलाटे यांनी केली आहे.