“टीमवर्कमधून समृद्ध गावांची निर्मिती शक्‍य”

मुंबई  – जलक्रांतीतून हरित क्रांती येणार आहे आणि हरित क्रांतीतून सुबत्ता. पण हे कुणा एकाचे काम नाही तर ते सर्वांनी एकत्र येऊन करावयाचे काम आहे. पडणाऱ्या पावसाच्या पाण्याची शास्त्रशुद्ध साठवणूक, पाणी वापर, पाणी नियोजन, पिक पद्धती, पौष्टिक गवताची निर्मिती अशा सर्व महत्वाच्या विषयांचा संस्कार आणि शिक्षण देण्याचे काम पाणी फाऊंडेशन करत असल्याचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

टीमवर्क आणि योजनेबद्दलच्या आपलेपणातून समृद्ध गावांची निर्मिती करणे शक्‍य असल्याचे सांगत पाणी फाऊंडेशनच्या सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पर्यावरण आणि आर्थिक समृद्धीच्या वाटेवर मार्गस्थ झालेल्या गावांचे, गावकऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्र्यांनी केले. तसेच शासन या सर्व कामात त्यांच्यासोबत असल्याची ग्वाही दिली.

22 मार्चच्या जागतिक जल दिनाचे औचित्य साधून पाणी फाऊंडेशनच्या “सत्यमेव जयते समृद्ध गाव’ स्पर्धेचा (पहिला टप्पा) गौरव सोहळा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कृषी मंत्री दादाजी भुसे, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख, राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक आमिर खान, किरण राव, सत्यजित भटकळ आणि डॉ. अविनाश पोळ उपस्थित होते.

उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वसामान्यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्मिती केली. त्याचे सुराज्यात रुपांतर करताना वसंत कानेटकरांनी म्हटल्याप्रमाणे पुन्हा एकदा गवताला भाले फुटण्याची गरज आहे. यातूनच अडचणींवर मात करत समृद्ध आणि पाणीदार गावांच्या निर्मितीसाठीची जिद्द आपल्याला मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पावसाचे वाहून जाणारे पाणी धरणे, कालवे या माध्यमातून साठवताना त्याचा नियोजनबद्ध वापर होणे गरजेचे असते. यासाठी माथ्यापासून पायथ्यापर्यतच नाही तर मुळापर्यंत जाऊन काम करण्याची तयारी ठेवावी लागते. तिच तयारी पाणी फाऊंडेशनने केली. गावकऱ्यांना सोबत घेऊन, सोप्या साध्या भाषेत त्यांच्यापर्यंत यासंबंधीचे ज्ञान पोहोचवून त्यांनी काम केल्याचे प्रशांसोद्‌गार ही मुख्यमंत्र्यांनी काढले.

उराशी “पाणीदार’ महाराष्ट्राचे स्वप्न – आमीर खान
पाणीदार महाराष्ट्राचे स्वप्नं उराशी बाळगून पाच वर्षांपूर्वी पाणी फाऊंडेशनने महाराष्ट्रात काम सुरु केले. आता या कामाचा अधिक गावात विस्तार न करता काही निवडक गावांमध्ये खोलवर जाऊन गाव समृद्धीचे काम करण्यात येत आहे. त्यामुळेच पाणी फाऊंडेशन सध्या फक्त 900 गावात काम करत असल्याची माहिती आमीर खानने दिली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.