फिलीपाईन्सच्या किनाऱ्याजवळ चिनी नौकांची टेहळणी

तब्बल 200 नौकांच्या उपस्थितीबाबत फिलीपाईन्सचा तीव्र आक्षेप

मनिला, (फिलीपाईन्स), दि. 21 – फिलीपाईन्सच्या किनारपट्टीजवळ चीनच्या तब्बल 200 नौका संशयास्पद रितीने टेहळणी करत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे फिलीपाईन्सच्या संरक्षण प्रमुखांनी तातडीने या नौकांना फिलीपाईन्सच्या किनारपट्टीपासून दूर जाण्याची मागणी केली आहे.

फिलीपाईन्सच्या किनाऱ्याजवळ चीनच्या नौकांची उपस्थिती म्हणजे चिथावणी देण्याचे कृत्य आहे. फिलीपाईन्सच्या सागरी सार्वभौमत्वाला अबाधित राखण्यासाठी दक्षिण चीन समुद्रातील फिलीपाईन्सच्या सागरी हद्दीतील खडकाळ सागरी भागापासून दूर जावे, अशी मागणी फिलीपाईन्सच्या संरक्षण प्रमुखांनी केली आहे.

चीनची ही सागरी घुसखोरी अजिबात सहन केली जाऊ शकणार नाही. चीनने सागरी हद्दीचे उल्लंघन करणे ताबडतोब्‌ थांबवावे आणि आपल्या नौका माघारी बोलवाव्यात, असे संरक्षण प्रमुख लोरेन्झाना यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. मात्र आपल्या सागरी सार्वभौमत्वाला अबाधित राखण्यासाठी फिलीपाईन्स कोणते पाऊल उचलेल, याचा कोणताच तपशील या निवेदनात देण्यात आलेला नाही.

व्हाइट्‌सन रीफ येथे सुमारे 220 चिनी जहाजांचा संचार सुरू असल्याचे दिसून आले आहे. चीननेही 7 मार्च रोजी या जहाजांच्या मालकीबाबतचा दावा केला होता, असे या वादग्रस्त भागावर देखरेख ठेवणाऱ्या एका सरकारी निरीक्षण संस्थेने सांगितले. या निरीक्षण संस्थेने या जहाजांचे फोटोही प्रसिद्ध केले आहेत.
आमच्या नागरिकांचे संरक्षण ही लष्कराची सर्वाधिक प्राथमिकता आहे, असे फिलीपाईन्सचे लष्करी प्रमुख लेफ्टनंट जनरल सिरीलिटो सोबेजाना म्हणाले. मात्र सागरी घुसखोरीबाबत चीनी दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

मासेमारी करणाऱ्या नौका नाहीत…
चिनी नौका ज्युलियन फेलिप या खाडीमध्ये आढळून आली आहेत. हा बुमरॅंगच्या आकाराचा 175 सागरी मैलांचा चिंचोळा सागरी प्रदेश आहे. या भागावर फिलीपाईन्सचा स्वायत्त हक्क आहे, असे फिलीपाईन्सच्या निरीक्षण संस्थेने म्हटले आहे. चिनी नौकांच्या घुसखोरीमुळे या भागातील सागरी जैव संपत्तीलाही धोका निर्माण होत आहे. कारण या नौका मासेमारी करणाऱ्या नसल्याचेही निरीक्षक गटाने म्हटले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.