प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 3 -राज्यात सातबारा उताऱ्यामध्ये एकसमानता आणल्यानंतर आता सातबारा उताऱ्यावर “क्यूआर कोड’ दिला जाणार आहे. हा “क्यूआर कोड’ स्कॅन करताच त्या सर्व्हेनंबरचे फेरफार उतारे, जमिनीचा नकाशा, जमिनीचे नेमके स्थान अक्षांश-रेखांश आदींची माहिती मिळणार आहे. याबाबतचा प्रस्ताव भूमि अभिलेख विभागाकडून राज्य शासनाकडे पाठविण्यात आला आहे. या प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर सातबारा उताऱ्यावर “क्यूआर कोड’ दिला जाणार आहे. त्यामुळे जमिनीची संपूर्ण माहिती मोबाइलवर उपलब्ध होणार आहे. यामुळे जमिनीच्या प्रकरणांतील फसवणुकीला कायमचा आळा बसणार आहे.
राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा उतारे, नकाशे, फेरफार आदी प्रकारचे दस्तावेजांचे संगणीकीकरण करण्यात येत आहे.
जमिनीची मोजणी अचूक पद्धतीने व्हावी, यासाठी आधुनिक पद्धतीच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. ही मोजणी करताना प्रत्येक सर्व्हे नंबरचे कोर्डीनेट निश्चित करण्यात येणार आहे. ते निश्चित केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर “क्यूआर कोड’ प्रिंट करण्यात येणार आहे. “क्यूआर कोड’ स्कॅन केल्यानंतर जमीन मालकाला त्यांच्या जागेची संपूर्ण माहिती क्षणात उपलब्ध होणार आहे.
सातबारा उताऱ्यावर “क्यूआर कोड’ कोठे छापायचा याबाबत राज्य शासनाकडून मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यासाठी भूमी अभिलेख विभागाने राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला आहे, अशी माहिती भूमी अभिलेखमधील अधिकाऱ्यांनी दिली. जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारात अनेकदा नागरिकांची फसवणूक होते. जमीन एका ठिकाणची दाखविली जाते, प्रत्यक्षात मात्र दुसऱ्या जमिनींची विक्री केली जाते. या सर्व प्रकारांना आळा बसणार आहे. प्रत्यक्ष जागेवर न जाता ही सर्व माहिती आणि जमिनीचे निश्चित ठिकाण बसल्याजागी समजणार आहे.