सुनील राऊत,पुणे,दि. 3 – महापालिका निवडणुकीसाठी कंबर कसलेल्या इच्छुकांकडून गेल्या काही महिन्यांमध्ये शहरात मोठ्या प्रमाणात बोर्ड, फ्लेक्स, बॅनर्स लावून अनधिकृतपणे जाहिरातबाजी करण्यात आली आहे. या जाहिरातींची माहिती महापालिकेने संकलित केली असून अशा फ्लेक्स, बोर्ड, बॅनर्ससाठी एक ते पाच हजारांचा दंड निश्चित केला आहे. त्यानुसार, “इच्छुकां’नी जेवढ्या वेळा असे जाहिरातीचे फ्लेक्स लावले, त्याची नोंद करण्यात आली असून त्यानुसार एकूण दंड आकारला जाणार आहे. सदर दंड एका “इच्छुका’ला कमीत कमी किमान एक लाख ते त्यापटीत होऊ शकतो. हा दंड भरल्याशिवाय महापालिका निवडणुकीसाठी “त्यांच्यावर’ पालिकेचा कोणताही दंड नसल्याची “एनओसी’ दिली जाणार नाही. त्यामुळे असे अनधिकृत फ्लेक्स लावून जाहिरातबाजी करणे संबंधितांना महागात पडणार आहे. महापालिकेच्या आकाशचिन्ह विभागाकडे यादी तयार असून एनओसी घेण्यासाठी आल्यानंतर संबंधित “इच्छुका’ला दंडाची पावती देण्यात येणार आहे.
महापालिका निवडणुका लांबल्या असल्या तरी “इच्छुकां’नी अद्याप आशा सोडलेली नाही. प्रभागात वेगवेगळ्या सणांचे कार्यक्रम, नेत्यांचे तसेच कार्यकर्त्यांचे वाढदिवस तसेच इतर वेगवेगळ्या उपक्रमांतून झळकण्यासाठी “इच्छुकां’कडून मोठ्या प्रमाणात बोर्ड, बॅनर्स तसेच फ्लेक्सबाजी केली जात आहे. अशा जाहिराती लावताना कोणतीही मान्यता घेतली जात नाही. अशा जाहिरातींमुळे शहराचे विद्रुपीकरण होत आहे. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी अशा जाहिरातींना एक जाहिरात लावलेली असल्यास हजार रुपये तर 10 पर्यंतच्या जाहिरातींना पाच हजारांचा दंड आकारण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार, महापालिका संबंधित “इच्छुक’ जाहिरातदारांना नोटिसा बजावत आहे. मात्र, हे जाहिरातदार या नोटिसांना केराची टोपली दाखवत आहेत. तर, काही जण कर्मचाऱ्यांनाच दमबाजी करीत आहेत. त्यामुळे, महापालिकेने अशा जाहिरातदारांची यादी तयार केली असून त्यांच्या नावापुढे दंडाची नोंद केली आहे. आता, पालिकेसाठी निवडणुकीचा फॉर्म भरताना पालिकेचे एनओसी लागणार आहे, अशी एनओसी मिळवायची असल्यास त्यांना त्यांच्या नावापुढे असलेला दंड भरावाच लागणार आहे. जेवढ्या जाहिराती लावल्या त्यापटीत हा दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे फ्लेक्सबाजी मोठीच महागात पडणार आहे.
दंडाचा मिळकतीवरही बोजा…
महापालिकेकडून अशा जाहिरातदारांची यादी मिळकतकर विभागासही दिली आहे. त्यांच्या मिळकतींवर या दंडाचा बोजा चढविला जाणार आहे. या शिवाय, या जाहिरातदारांना महापालिकेची थकबाकी नसल्याची एनओसीही उमेदवारी अर्ज भरण्यासाठी घ्यावी लागते. त्यावेळी या दंडाच्या थकबाकीच्या यादीत संबंधित जाहिरात करणाऱ्याचे नाव आहे की नाही याची खातरजमा करून दंड भरल्याशिवाय एनओसी दिली जाणार नाही. त्यामुळे आता दंड भरण्यास नकार दिला तरी किमान निवडणुकीसाठी तरी त्यांना महापालिकेचा दंड मोजावाच लागणार आहे.
11 निरीक्षकांना नोटिसा
अनधिकृत जाहिरातींवर दंड आकरणी तसेच गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी डिसेंबर 2021 मध्ये दिले होते. त्यानंतर गेल्या सात महिन्यांत महापालिकेच्या 16 मधील केवळ 5 अतिक्रमण निरीक्षकांनीच ही कारवाई केली आहे. तर, उर्वरित 11 जणांनी आयुक्तांच्या आदेशालाच हरताळ फासला आहे. त्यामुळे त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली असून खुलासा करण्यास सांगण्यात आले आहे.
अनधिकृतपणे जाहिरात लावणाऱ्यांची यादी तयार करण्यात येत आहे. त्यानुसार, नोटिसाही बजावण्यात आल्या असून जे दंड भरणार नाहीत त्यांच्या मिळकतकरात तो वसूल केला जाईल. या शिवाय, त्यांचे निवडणूक एनओसीसाठी अर्ज आल्यास आधी दंड भरून नंतरच एनओसी दिली जाणार आहे.
– डॉ. यशवंत माने, उपायुक्त, आकाशचिन्ह आणि परवाना विभाग