- करयोग्य मुल्यांचे फेरमूल्यांकन
- सर्वसाधारण सभेत निर्णय
पिंपरी – जुन्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यांचे फेर मूल्यांकन करुन करवाढ करण्यात आली होती. ही करवाढ एकएप्रिलपासून लागू होणार होती. परंतु ही करवाढ रद्द करण्याची मागणी महापौर आणि व सत्तारुढ पक्षनेत्यांनी केल्यानंतर आयुक्तांनी तसे आदेश संबंधित विभागाला दिले असून सर्वसाधारण सभेमध्ये सदरचा प्रस्ताव दप्तरी दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी दिली.
पिंपरी चिंचवड शहरातील जुन्या मालमत्तांच्या करयोग्य मूल्यांचे फेरमूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानुसार नवीन करयोग्य मालमत्ताकर लागू करण्यास सुरूवात झाली आहे. हे फेरमूल्यांकन करताना सन 2021-22 च्या रेडीरेकनरनुसार आकारणी होणाऱ्या प्रतिचौरस फूट दराच्या 50 टक्के म्हणजे निम्मा दर लागू झाला आहे. करयोग्यमूल्य पद्धतीतील बदलामुळे सन 2005-06 पूर्वीच्या सर्व जुन्या मालमत्तांवर दीड ते दोनपट जादा दराने मालमत्ताकर आकारणी केली जाणार आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिलपासून करण्यात येणार होती. मात्र, करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांवर हा करवाढीचा बोझा टाकू नये, तसेच सदरचा प्रस्ताव दप्तरी दाखल केला असल्याने त्याची अंमलबजावणी करू नये, अशी मागणी महापौर माई ढोरे व सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे केली होती. त्यानुसार आयुक्तांनी करवाढ करण्याचा निर्णय न घेतल्याने शहरातील निवासी व बिगरनिवासी मिळकत धारकांना मोठा दिलासा मिळणार आहे असल्याचे नामदेव ढाके यांनी सांगितले.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदींनुसार आयुक्त यांच्या अधिकारात सन 2021-22 या आर्थिक वर्षापासून शहरातील जुन्या मिळकतींच्या करयोग्य मूल्यामध्ये वाढ करण्याचा निर्णय तात्कालीन आयुकत श्रावण हर्डीकर यांनी घेतला होता. याबाबत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आयुक्त राजेश पाटील यांच्याशी चर्चा करुन यंदाच्या करवाढीला स्थगिती देण्यासंदर्भात विनंती केली होती. ही विनंती मान्य करुन आयुक्त यांनी सन 2021-22 या आर्थिक वर्षात कुठल्याही मिळकतींना कर लादू नये, असे आदेश संबधित विभागाला दिले असल्याचे पक्षनेते नामदेव ढाके यांनी सांगितले.