पिंपरी – कंपनीत मटेरियल खाली करण्यासाठी तसेच मटेरियल भरण्यासाठी येणाऱ्या वाहन चालकांकडून हजारो रुपये मागणाऱ्या दोघांच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना हिंजवडी येथे घडली.
संतोष ज्ञानू सावंत (वय 44, रा. तळेगाव दाभाडे) यांनी मंगळवारी (दि. 30) याबाबत हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अमृत वळवे, रामनारायण पारखी (दोघे रा. माण, ता. मुळशी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी सावंत यांच्या दोन कंटेनर गाड्या हिंजवडी येथील डसॉल्ट कंपनीत मंगळवारी (दि. 30) दुपारी सव्वाबारा वाजता मटेरियल खाली करण्यासाठी आल्या होत्या. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांना फोन करून सांगितले की, “मी अमृत वळवे बोलतोय. तुमच्या गाड्या खाली होण्यासाठी कंपनीत आलेल्या आहेत. मी व रामनारायण पारखी याने गाड्या थांबवलेल्या आहेत. तुम्हाला प्रत्येक गाडीमागे सहा हजार रुपये द्यावे लागतील. त्याशिवाय तुमच्या गाड्या खाली होऊ देणार नाही.’ आरोपींचा कसलाही संबंध नसताना त्यांनी माथाडी संघटनेच्या नावाखाली जबरदस्तीने, मारण्याची धमकी देऊन पैशांची मागणी केली. तसेच फिर्यादी यांचे कंटेनर आरोपी लोड अथवा अनलोड करून देत नसल्याचेही फिर्यादीत म्हटले आहे.