#Prokabaddi2019 : ‘जाएंट’ गुजरातपुढे योद्धा निष्प्रम

हैदराबाद – नाव मोठे लक्षण खोटे असे म्हटले जाते. यु पी योद्धा संघाबाबत ते सार्थ ठरले. गुजरात फॉर्च्युनजाएंटसने त्यांचा 44-19 असा दारूण पराभव केला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये लागोपाठ दुसऱ्या विजयाची नोंद केली. यजमान तेलुगु टायटन्स संघासाठी येथील टप्पा निराशाजनक ठरला. पाटणा पायरेट्‌सपुढे त्यांना 22-34 अशी हार मानावी लागली आहे. टायटन्सचा हा सलग चौथा पराभव होता.

गचीबावली स्टेडियमवर झालेल्या सामन्यात गुजरातचा रोहित गुलिया हा शिल्पकार ठरला. त्याने पल्लेदार चढाया करीत योद्धाचा बचाव सपशेल हाणून पाडला व 11 गुणांसह सुपरटेनची कामगिरी केली. सचिनकुमार व परवेश भैसवाल यांनी प्रत्येकी 6 गुणांची कमाई करीत त्याला चांगली साथ दिली. पूर्वार्धातच गुजरातने 19-9 अशी आघाडी घेतली होती. हीच आघाडी त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. त्याच्या दडपणाखाली योद्धाच्या खेळाडूंची दमछाक झाली. त्यांच्या खेळात सांघिक कौशल्याचा अभावच होता. ही गोष्ट गुजरातच्या पथ्यावर पडली नाही तर नवलच. योद्धाच्या चढायांची मुख्य भिस्त मोनू गोयाटवर आहे हे लक्षात घेऊनच गुजरातच्या खेळाडूंनी जास्तीत जास्त वेळ तो मैदानाबाहेर हीच रणनीती अंमलात आणली. मोनूला दोनच गुण मिळविता आले. त्या तुलनेत त्याचा महाराष्ट्रीयन सहकारी श्रीकांत जाधवने 5 गुण मिळविले.
टायटन्सचा चौथा पराभव

टायटन्स संघाचे नशीब चांगले नाहीच असेच दिसून येत आहे. घरच्या प्रेक्षकांसमोर लागोपाठ चौथा सामना त्यांनी गमावला याहून दुसरी निराशा असूच शकत नाही. तीन वेळा ही स्पर्धा जिंकणाऱ्या पाटणा संघाने नावलौकिकास साजेसा खेळ करीत त्यांच्याविरूद्ध मध्यंतरालाच 23-9 अशी आघाडी घेत सामन्याचे चित्र स्पष्ट केले होते. तरीही या मोसमातील सर्वात महागडा खेळाडू सिद्धार्थ देसाई व त्याचा भाऊ सूरज हे उत्तरार्धात सामन्याचा नूर पालटतील अशी त्यांना आशा होती. मात्र तसे घडलेच नाही. पाटणाने शेवटपर्यंत आघाडी टिकवित सामना सहज जिंकला. सिद्धार्थला 6 गुण तर सूरजला एक गुण नोंदविता आला. पाटणा संघाकडून परदीप नरवालने 7 गुण तर जयदीपने 6 गुणांची कमाई केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)