पुणे- जामिनावर कारागृहातून बाहेर पडताच अट्टल गुन्हेगार आणि त्याच्या दहा ते बारा साथीदारांनी येरवडा ते लोणी काळभोर दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढली. खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा यासारख्या गंभीर गुन्हातील हा अट्टल गुन्हेगार आहेत. या रॅलीचा व्हिडिओ सोशल मिडियावर प्रसारित होताच लोणी काळभोर पोलिसांनी अट्टल गुन्हेगारासह त्याच्या दहा ते अकरा साथीदारांवर गुन्हा नोंदवला आहे.
यापुढे असा प्रकार घडल्यास गुन्हेगारांचा योग्य पध्दतीने माज मोडण्यात येईल असा इशारा लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिला आहे.
रॅली काढुन स्वागत झालेल्या गुन्हेगारांचे शुभम कैलास कामठे (वय 26, रा. कदमवाकवस्ती ता. हवेली) नाव असुन, शुभम कामठे याच्या स्वागताचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी शुभम कामठे याच्यासह ऋषिकेश सुरेश पवार, राज रवींद्र पवार, संकेत सुनील गायकवाड, अक्षय कांबळे, समीर हाश्मी (रा. सर्व कदमवाकवस्ती, ता.हवेली) व पाच अनोळखी अशा अकरा जनांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार रोहिदास पारखे यांनी तक्रार दिली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी घडली होती.
लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती येथील अट्टल गुन्हेगार, शुभम कामठे हा खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा अशा विविध गुन्हात मागिल अडीच वर्षापासुन येरवडा कारागृहात शिक्षा भोगत होता. शुभम कामंठे यास न्यायालयाने जामिन दिल्याने, शुक्रवारी (ता. ) दुपारी त्याची सुटका झाली. सुटका होऊन कारागृहाबाहेर पडताच, ऋषिकेश सुरेश पवार, राज रवींद्र पवार, संकेत सुनील गायकवाड, अक्षय कांबळे, समीर हाश्मी व त्याच्या कांही साथीदारांनी येरवडा कारागृह ते लोणी काळभोर या दरम्यान दुचाकी व चारचाकी वाहनांची रॅली काढुन कामठेला घरी आणले. कामठे याच्या साथीदारांनी वरील रॅलीचा एक व्हिडीओ ही सोशल मिडीयावरुन व्हायरल केला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओत शुभम कामठे जिंदाबाद, आला रे आला बाप आला अशा मोठ-मोठ्याने घोषणा देत, कामठे याचे साथीदार रस्त्यात दहशत निर्माण करत असल्याचेही दिसुन आलेले आहे.
शुभम कामठे याच्या स्वागताचा व्हिडीओ पोलिसांना मिळाला सोशल मिडियावर प्रसारित झाला होता. तो पोलिसांना प्राप्त होताच शुभम कामठे व त्याच्या सहकाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. असं वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरज बंडगर (लोणी काळभोर) यांनी सांगितलं आहे.