प्रो कबड्डी लीगच्या 8 व्या हंगामाला 22 डिसेंबरपासून बंगळुरु येथे सुरुवात झाली आहे. कोरोनामुळे गेली दोन वर्षे स्थगित केलेली ही स्पर्धा पुन्हा एकदा आपला थरार घेऊन प्रक्षकांसमोर येत आहे. याच पार्श्वभूमिवर या लेखात यंदाच्या हंगामातील सर्व 12 संघाच्या कर्णधारांविषयी जाणून घेणार आहोत.
1) पुणेरी पलटण : नितीन तोमर
मुळचा उत्तर प्रदेशचा असलेला नितीन तोमर यंदा पुणेरी पलटणकडून खेळताना दिसणार आहे. याचबरोबर तो पलटणचे नेतृत्त्वही करणार आहे. यूपी योद्धाचा माजी कर्णधार नितीन तोमर दोन हंगामांच्या अंतरानंतर नेतृत्वात पुनरागमन करण्यास उत्सुक आहे. नितीनने यापूर्वी प्रो कबड्डी लीगच्या पदार्पणाच्या मोसमात त्याच्या घरच्या यूपी योद्धा संघाचे नेतृत्व केले होते. दुसरी कडे उपकर्णधार पदी पुणेरी पलटणने 21 वर्षीय बचावपटू विशाल भारद्वाजला संधी दिली आहे.
2) यू मुंबा : फझेल अत्राचली
भाषा आणि संवादाच्या गोंधळामुळे परदेशी खेळाडूंसाठी प्रो कबड्डी संघाचे नेतृत्व करणे सोपे नाही. परंतु या सर्व अडथळ्यांना न जुमानता, यू मुंबाने फझेल अत्राचली अजूनही कर्णधार म्हणून कायम ठेवले आहे. फझेलने त्याच्या नेतृत्त्वाखाली मुंबाला तीन पैकी तीन वेळा बाद फेऱीत स्थान मिळवून दिले आहे. तर एकदा उपविजेते पदही मिळवून दिले आहे. यू मुंबाला 2019 प्रो कबड्डी लीगच्या उपांत्य फेरीतून बाहेर पढावे लागले मात्र फजेलने हंगामातील सर्वोत्तम बचावपटूचा सन्मान मिळवला. यंदा उदयोन्मुख खेळाडू अभिषेक सिंग यू मुंबाचा कर्णधार असले.
3) पाटणा पायरेट्स : प्रशांत कुमार राय
प्रशांत कुमार राय प्रो कबड्डीच्या प्रत्येक हंगाम खेळलेल्या मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे. आपण प्रशांतला यापूर्वी कधीही कर्णधाराच्या भूमिकेत पाहिले नाही. मात्र, पटनाचा माजी स्टार प्रदीप नरवालच्या जागी रेडर आणि कर्णधार म्हणून भूमिका पार पाडणे त्याच्यासाठी आव्हानात्मक असेल. त्याच्यासोबत बचावपटू नीरज कुमार उपकर्णधार असेल.
4) जयपूर पिंक पँथर्स : दीपक हुडा
विद्यमान भारतीय कर्णधार असलेल्या दीपक निवास हुडाला प्रो कबड्डीचे पहिले विजेते असलेल्या जयपूर पिंक पँथर्सने यंदाच्या लिलावात कायम ठेवून कर्णधारपदाची धूराही दिलि आहे. दीपककडे तेलुगू टायटन्स आणि पुणेरी पलटनचे नेतृत्व करण्याचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे दीपक पँथर्सला पुन्हा एकदा विजयी मार्गावर नेईल असा संघ व्यवस्थापनासह चाहत्यांचा विश्वास आहे.
5) तमिळ थलायवास – सुरजीत सिंग
चेन्नईस्थित तमिळ थलायवाजने सुरजीत सिंगची त्यांचा नवीन कर्णधार म्हणून निवड केले आहे. 25 हाय 5 चा टप्पा पार करणारा सुरजीत हा प्रो कबड्डीतील पहिला आणि एकमेव बचावपटू आहे. उजव्या कोपर्यात बचावपटू म्हणून खेळणार्या सुरजीतने यापूर्वी नेतृत्त्व करताना बंगाल वॉरियर्सला सलग दोन वेळा उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले आहे. यंदा के प्रपंजन उपकर्णधार म्हणून थलायवाजमध्ये पुनरागमन करत आहे.
6) गुजरात जायंट्स : सुनील कुमार
गुजरात जायंट्सचे यंदा प्रो कबड्डी लीगचे तिसरे वर्ष आहे. या तिनही वेळा गुजरातचे नेतृत्त्व करणारा सुनील कुमार यंदाही कर्णधार म्हणून भूमिका पार पाडेल. 2018 मध्ये गुजरातने सुनील कुमारच्या नेतृत्त्वाखाली उपविजेतेपद मिळवले होते. उजव्या कोपर्यात बचावपटून म्हणून खेळणार्या सुनीलची वैयक्तिक कामगिरी निराशाजनक होती. असे असले तरी अगदी लहान वयातच सुनील कुमारने समोरून नेतृत्व करण्याची विलक्षण शैली विकसित केली आहे.
7) यूपी योद्धा : नितेश कुमार
उत्तर प्रदेशचे युपी योद्धा ’सेनापती नितेश कुमार’च्या नेतृत्वाखाली प्रो कबड्डीच्या आठव्या हंगामात कूच करण्यासाठी सज्ज आहेत. 24 वर्षीय नितेशने यापूर्वी कर्णधारपदाच्या पदार्पणाच्या मोसमात उत्कृष्ट कामगिरी करत यूपी योद्धाला प्लेऑफ फेरीसाठी पात्र ठरण्यात यशस्वी झाला होता. कर्णधार यामध्ये सिंहाचा वाटा उचलत बचाव करताना तब्बल गुण मिळवले होते. सातत्य आणि निर्भय वृत्ती मुळे तो भारतीय राष्ट्रीय संघाचा पुढचा कर्णधार होण्याची शक्यता आहे.
8) दबंग दिल्ली : जोगिंदर नरवाल
दिग्गज जोगिंदर नरवालने दबंग दिल्लीचे नेतृत्त्व स्वीकारल्यापासून दिल्लीचे नशीब एकदम बदलले आहे. त्यांच्या मागील दोन यशस्वी हंगामानंतर ते यंदाच्या स्पर्धेत ते विजेतेपदाचे सांभाव्य दावेदार म्हणून उतरतील. मनजीत छिल्लर, अजय ठाकूर, संदीप नरवाल आणि जीवा कुमार यांसारखे सरस खेळाडू असलेल्या संघाचे नेतृत्त्व जोगिंदर करणार आहे. 39 वर्षीय जोगिंदरने आपल्या प्रदीर्घ कारकिर्दीत अनेक वेळा नेतृत्वाची भूमिका बजावली आहे.
9)तेलुगू टायटन्स : रोहित कुमार
यंदा तेलुगू टायटन्सचे नेतृत्त्व करणार्या रोहित कुमारने 2018 मध्ये बंगळुरु बुल्सला त्याच्या नेतृत्त्वाखाली विजेतेपद मिळवून दिले आहे. त्यामुळे तेलुगु टायटन्सने त्याच्यावर विश्वास दाखवत कर्णधार पदाची धुरा सोपवली आहे. यंदा रोहितच्या सोबतीला स्टार चढाईपटू सिद्धार्थ देसाई उपकर्णधार असेल.
10) बंगाल वॉरियर्स : मनिंदर सिंग
गतविजेतेत्या बंगाल वॉरियर्स मनिंदर सिंगवर पुन्हा एकदा विश्वास दाखवत त्याच्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवली आहे. गेल्या मोसमात मनिंदर सिंगला वॉरियर्सचा कर्णधार म्हणून बढती देण्यात होती. मनिंदरने संघ व्यवस्थापनाचा विश्वास सार्थ ठरवत बंगालला अंतिम फेरीत पोहचवले. पण खांद्याच्या दुखापतीमुळे त्याला अंतिम सामन्याला मुकावे लागले होते.
11) बेंगळुरू बुल्स : पवन सेहरावत
बेंगळुरू बुल्स प्रथमच रोहित कुमारशिवाय यंदाच्या हंगामात उतरणार आहेत. बंगळुरूचा नवा कर्णधार म्हणून यंदा पवन कुमार सेहरावतने आव्हान स्वीकारले आहे. तत्पूर्वी, रोहित कुमारच्या अनुपस्थितीत पवनने बेंगळुरूचे हंगामी कर्णधारपद भूषवत आपल्या संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले होते. यावेळी बचावपटू महेंद्र सिंग बंगळुरु बुल्सचा उपकर्णधार असेल.
12) हरयाणा स्टीलर्स : विकास कंडोला
गेल्या हंगामात हरयाणाकडून सर्वाधिक गुण पटकावणार्या युवा विकास कंडोलावर यंदा हरयाणा स्टीलर्सच्या कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली आहे. आक्रमक आणि चपळ असलेला विकास डॅशसाठी ओळखला जातो. कंडोलाने त्याच्या प्रो कबड्डी लीग कारकिर्दीत आतापर्यंत 55 सामन्यांमध्ये 7.69 च्या सरासरीने एकूण 423 चढाई गुण मिळवले आहेत.