Pro Kabaddi League : प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगमाला नुकतीच धडाक्यात सुरुवात झाली. कोरोनामुळे दोन वर्षांसापासून दूर असलेले खेळाडू आणि चाहते यंदा पूर्ण कसर भरुन काढणार यात शंका नाही. देशांतर्गत स्पर्धेंसह आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपली छाप पाडणारे मनजीत चिल्लर, सुरेंदर नाडा, संदीप नरवाल, मोहित चिल्लर आणि रविंदर पहल यांनी प्रो कबड्डी लीगही गाजवली आहे. या पार्श्वभूमिवर या लेखातून प्रो कबड्डी लीगमधील पाच सर्वोत्तम बचावपटूंबाबत जाणून घेणार आहोत.
1. मनजीत चिल्लर
प्रो कबड्डी लीगच्या इतिहासात मनजीत चिल्लरनने सर्वकालीन महान बचावपटू म्हणून ओळख निर्माण केली आहे. प्रो कबड्डी लीगमध्ये त्याने आतापर्यंत खेळलेल्या 110 सामन्यांतून एकूण 565 गुणांची लयलुट केली आहे. यामध्ये बचाव करताना 341 गुण मिळवले आहेत. त्याने प्रो कबड्डीच्या पहिल्या हंगामात बेंगळुरू बुल्ससाठी खेळताना आणि पुन्हा तिसर्या हंगामात पुणेरी पलटणसाठी खेळताना स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट बचावपटू’चा पुरस्कार आपल्या नावे केला आहे.
त्याने सुरेंदर नाडासोबत संयुक्तपणे लीगमध्ये आतापर्यंत सर्वाधिक 19 वेळा हाय 5 गुण मिळवले आहेत. त्याने प्रो कबड्डी लगीमध्ये जयपूर पिंक पँथर्स, तमिळ थलियावास, बेंगळुरू बुल्स आणि पुणेरी पलटनचे प्रतिनिधीत्व केले आहे. यंदा मनजीत चिल्लर दबंग दिल्ली संघाकडून आपले नशिब आजमावणार आहे.
2.सुरेंदर नाडा
सुरेंदर नाडा प्रो कबड्डी लीगच्या सर्वोत्तम बचावपटूंपैकी एक मानला जातो. पीकेएलकेमध्ये त्याने आतापर्यंत खेळलेल्या 72 सामन्यांतून 248 गुण मिळवले आहेत. यामध्ये बचाव करताना 227 गुण मिळवले आहेत. तो मनजीत चिल्लरसह लीगमध्ये संयुक्तपणे सर्वाधिक 19 वेळा हाय 5 गुण मिळवणारा खेळाडू आहे. त्याने आतापर्यंत यू मुंबा, बंगळुरु बुल्स आणि हरयाना स्टिलर्सचे प्रतिनिधित्व केले आहे. सुरेंदर यंदाच्या हंगामातही हरयाना स्टिलर्सचा भाग असणार आहे.
3.संदीप नरवाल
संदीप नरवालने त्याच्या पीकेएल कारकिर्दीची सुरुवात पटना पायरेट्सकडून केली. पहिल्या तीन हंगामांत तो पायरेट्सचा महत्वाचा खेळाडू होता. प्रो कबड्डीच्या दुसर्या हंगामात त्याने पायरेट्सचे नेतृत्व करत संघाला उपांत्य फेरीत स्थान मिळवून दिले होते. एक तगडा बचावपटू म्हणून ओळख असलेल्या संदीपने त्या प्रो कबड्डीच्या कारकिर्दीत 127 सामन्यांमध्ये 563 गुणांची कमाई केली आहे. यामध्ये बचाव करताना 314 तर चढाई करताना 249 गुण मिळवले आहेत. यंदा संदीप दबंग दिल्लीकडून खेळणार आहे.
4. मोहित चिल्लर
माहित चिल्लरने प्रो कबड्डी लीगमध्ये आतापर्यंत खेळलेल्या 109 सामन्यांतून 284 गुण आपल्या खात्यात जमा केले आहेत.बचावपटू म्हणून उजव्या कोपर्यात खेळणार्या मोहितकडे सामन्याचे एकहाती चित्र पालटण्याची क्षमता आहे. मोहित या स्पर्धेतील 5 अव्वल बचावपटूंमध्ये चौथ्या स्थानावर आहे. यंदा मोहित तमिळ थलायवाजकडून खेळणार आहे. त्याने यापूर्वी बेंगळुरू बुल्स आणि हरियाणा स्टीलर्सचेही प्रतिनिधित्व केले आहे.
5. रविंदर पहल
प्रो कबड्डी लीगच्या दुसर्या हंगामात स्पर्धेतील ‘सर्वोत्कृष्ट बचावपटू’ म्हणून पुरस्कार मिळवणारा रविंदर पहल यंदा गुजरात जायंट्स संघाचा महत्वाचा खेळाडू असणार आहे. प्रो कबड्डीच्या सर्व 7 हंगामात खेळणार रविंदर यंदा गुजराच्या बचावफळीचे नेतृत्व करेल. त्याने प्रो कबड्डी कारकिर्दीत दुसर्या आणि पाचव्या मोसमात बचाव करताना 50 पेक्षा अघिक गुण मिळवले आहेत. त्याने संपूर्ण कारकिर्दी 114 सामन्यांत 344 गुणांची कमाई केली आहे.