बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ प्रियंका चोप्रा आपले विचार खुलेपणाने मांडण्यासाठी ओळखली जाते. आपल्या बिनदास्त वक्तव्यांमुळे प्रियंका अनेकदा वादात अडकल्याचंही पाहायला मिळालं आहे. अशातच आता प्रियंकाने लग्नानंतर पहिल्यांदा मंगळसूत्र घालण्याचा अनुभव शेअर करत पुढील पिढीतील मुली मंगळसूत्राचा स्वीकार करतील का? याबाबत वक्तव्य केलं आहे.
बॉलिवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा व हॉलिवूड अभिनेता निक जोनस 2018मध्ये विवाहबंधनात अडकले होते. नुकताच प्रियंकाने आपल्या इंस्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती मंगळसूत्र परिधान करण्याबाबत बोलत आहे.
प्रियंका म्हणते, “मला आजही आठवतंय जेव्हा मी लग्नानंतर पहिल्यांदा मंगळसूत्र परिधान केलं… मंगळसूत्राचं महत्व काय असतंय या कल्पनेसह आम्ही लहानाचे मोठे झालो. मी जेव्हा मंगळसूत्र पहिल्यांदा परिधान केलं तो क्षण माझ्यासाठी स्पेशल होता. मात्र एक नव्या जमान्याची महिला असल्याने मला त्याचे परिणामही माहिती आहेत.
मला मंगळसूत्र आवडतं की ते पुरुषप्रधान संस्कृतीचं प्रतीक वाटत? यावर मी म्हणेन की आमची पिढी ही या दोन्ही भावनांचा मध्य साधणारी आहे. आम्हाला संस्कृती आणि स्वतःच अस्तित्व हे दोन्ही जपायला आवडतं. आमच्या पुढच्या पिढीतल्या मुलींचे विचार कदाचित याहून वेगळे असतील.”