खासगी हॉस्पिटलने मयत पास पुरवावेत

महापालिका थेट साधणार संपर्क 

पुणे – खासगी हॉस्पिटलने मयत पास पुरवावे, यासाठी महापालिका पाऊल उचलणार आहे. हे पास देण्यासाठी खासगी हॉस्पिटल तयार होत नाहीत. त्यामुळे त्यांना यासाठी संपर्क केला जाणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. कल्पना बळीवंत यांनी दिली. 

उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यविधी करण्यासाठी, महापालिकेच्या मयत पासची आवश्‍यकता असते. हा पास मिळवण्यासाठी मयताच्या नातेवाईकांना पास मिळणाऱ्या ठिकाणी रात्री-अपरात्री फिरावे लागते. त्यामुळे हॉस्पिटलमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मयत पास त्याच हॉस्पिटलमध्ये मिळाल्यास नागरिकांचाही त्रास वाचणार आहे.

या पार्श्‍वभूमीवर जन्म-मृत्यू विभागाने खाजगी हॉस्पिटलची एप्रिल 2018 मध्ये बैठकही घेतली होती. त्यावेळी केवळ 9 हॉस्पिटलने तयारी दर्शविली होती. सद्यस्थितीत मृत्यूचे कारण असलेला फॉर्म-4 हॉस्पिटल कडूनच भरून दिला जातो. हा फॉर्म दिल्यावरच पालिकेच्या यंत्रणेकडून पास मिळतो. मात्र, संबंधित हॉस्पिटलमध्येच हा पास उपलब्ध झाल्यास नागरिकांचा आणि पर्यायाने महापालिका यंत्रणेवरील ताण कमी होणार आहे. त्यामुळे महापालिकेने सदर पास हॉस्पिटलमध्येच मिळावे यासाठी कार्यवाही सुरू केली आहे.

मृत्यू दाखल्यासाठी आग्रह टाळावा
कोविडमुळे मृत्यू झालेल्या व्यक्‍तीच्या मृत्यू दाखल्यावर त्याचा “मृत्यू हा कोविड-19 मुळे झाला’ याचा उल्लेख नसतो. त्यामुळे मयताच्या नातेवाईकांना त्याचा पुरावा देण्यासाठी सर्व कागदपत्रे दाखल्यासह मागितली जातात. पण, करोना आपत्तीत संबंधित यंत्रणेने कोविड-19 च्या मृत्यूचा पुरावा म्हणून हॉस्पिटलचा फॉर्म 4 व नमुना 2 ग्राह्य धरावा, यासाठीही पालिका संबंधित व्यवस्थेशी पत्रव्यवहार करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.