लंडन- पाकिस्तानचे अमेरिकेतील माजी राजदूत हुसेन हक्कानी आणि अमेरिकेतील स्तंभकार डॉ. मोहम्मद तकी यांनी साउथ एशियन अगेन्स्ट टेररिजम अँड अँड फॉर ह्यूमन राइटस अर्थात एसएएटीएच या संघटनेची स्थापना केली आहे. या संघटनेची पूर्वीची संमलेने पूर्वी लंडन आणि वॉशिंग्टन येथे झाली आहेत. मात्र आता करोनाच्या स्थितीत ते डिजिटलच्या माध्यमातून पार पडले. मात्र या संमेलनात सहभागी झालेल्या अनेक नामांकित व्यक्तींनी पाकिस्तानला आरसा दाखवला आहे.
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी अलिकडेच एसएएटीएचवर गंभीर आरोप केला होता. देशाला आंतरराष्ट्रीय स्तरावर दुबळा करण्याचे काम या संघटनेने केले असे म्हटले होते. त्यांच्या या आरोपाचा हक्कानी यांनी डिजिटल संमेलनात समाचार घेतला.
दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचे धोरण आणि स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे प्रयत्न यामुळे पाकिस्तानच्या पायाखालची जमीन वेगाने सरकते आहे. मानवाधिकारांसाठी आवाज उठविणाऱ्या व्यक्ती आणि संघनांमुळे पाकिस्तान दुबळा झालेला नाही अशा शब्दांत हक्कानी यांनी सुनावले आहे.
याच संमेलनात सहभागी काही मान्यवरांनी तर इम्रान खान यांची तुलना लष्कराच्या हातातील बाहुले अशा शब्दांत केली आहे. लष्करावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे.
देशात आज माजलेले अस्थैर्य, सातत जाणवणारे असुरक्षित वातावरण, शेजारी देशांच्या बरोबरीने चालण्याची नसलेली क्षमता याकरता केवळ आणि केवळ पाकिस्तानचे लष्करच जबाबदार असल्याचे त्या वक्त्यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानात तर आज एकप्रकारे आघोषित मार्शल लॉ लागू असल्याचा आरोप पश्तून नेते आणि माजी संसद सदस्य अफरासियाब खटक यांनी केला आहे. संसदेचे अधिवेशन केव्हा घ्यायचे, घ्यायचे की नाही, त्यात कोणत्या विषयावर बोलायचे, मतदानात सहभागी व्हायचे की नाही याचे आदेश लष्कराकडून संसद सदस्यांना दिले जातात. हा पाकिस्तानातील सगळ्यांत धोकादायक मार्शल लॉ असून त्याने घटनात्मक संस्थांना खिळखिळे आणि दुबळे करून टाकले असल्याचे खटक यांनी म्हटले आहे.
अनेक मान्यवर पत्रकार, लेखक, नेते, ब्लॉगर, सोशल मीडिया आणि विविध संस्थांशी संबंधित असलेले कार्यकर्ते या संघटनेचे सदस्य असून ते सनदशीर मार्गाने पाकिस्तानातील विविध मुदद्दयांवर परखड भाष्य करत असतात. मात्र त्यांच्यावर येत असलेल्या दबावाचाही उहापोह या संमेलनात करण्यात आला.