नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅट कमी न करणाऱ्या राज्य सरकारांना बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनावल्यानंतर बिगर भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी तीव्र शब्दांत प्रत्युत्तर दिले आहे. सध्या राजकीय नेते यावरून आरोप प्रत्यारोप करतांना दिसून येत आहे.
याच मुद्द्यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर खोचक टीका केली आहे. पालघर येथे पत्रकरांशी बोलतांना सुप्रिया सुळे म्हणाल्या,’देशाचे पंतप्रधान सदासर्वकाळ राजकारणी म्हणून वागत असतात. भारतीयांना त्यांच्या कडून पंतप्रधान पदावरील एक जबाबदार व्यक्ती म्हणून त्यांची चांगली वागणूक अपेक्षित आहे.
त्या पुढे म्हणाल्या,’त्यांच्या या वागण्यामुळे मी त्यांच्यावर नाराज नसून हैराण आहे.’ असेही सुळे माध्यमांशी बोलतांना म्हणाल्या आहे.
दरम्यान, इंधन कराबाबत केंद्र सरकारने सर्व राज्यांच्या सहमतीने निर्णय घ्यावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीपूर्वी पत्रकारांशी संवाद साधताना अजित पवार यांनी इंधन करासह इतर मुद्यांवर भूमिका स्पष्ट केली. अजित पवार म्हणाले, राज्याच्या अर्थसंकल्पात कोणतीही करवाढ करण्यात आली नाही. याउलट सीएनजी आणि पीएनजी (घरगुती वापरासाठी पाइपलाइन गॅस) गॅसवरील करात कपात करण्यात आली. राज्याच्या अर्थसंकल्पात सीएनजी गॅसवरील कर 13.50 टक्क्यांवरून 3 टक्के इतका केला. राज्याच्या तिजोरीवर 1000 कोटींचा बोझा पडला आहे. मात्र, तरीदेखील सरकारने नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी म्हटले.