नवी दिल्ली- भूतानचे पंतप्रधान त्शेरिंग तोग्बे गुरुवारपासून ५ दिवसांसाठी भारतभेटीवर येणार आहेत. जानेवारी महिन्यात भूतानच्या पंतप्रधानपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून त्यांचा हा पहिलाच परदेश दौरा असणार आहे.
आपल्या भारत भेटीदरम्यान तोग्बे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी विविध विषयांवर विस्तृत चर्चा करणार आहेत. यावेळी भारत आणि भूतान दरम्यानचे मैत्री संबंध आणि विविध क्षेत्रांमधील भागीदारीच्या संबंधांची व्याप्ती अधिक वाढवण्यावर भर दिला जाणार आहे.
तसेच ते राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचीही भेट घेणार आहेत. आपल्या भेटीदरम्यान ते मुंबईलाही भेट देणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे.
तोग्बे यांच्यासोबत भूतानचे परराष्ट्र आणि परराष्ट्र व्यापार मंत्री, ऊर्जा मंत्री आणि उद्योग आणि वाणिज्य मंत्री यांचा समावेश असलेले उच्चस्तरीय शिष्टमंडळ देखील असणार आहे.