अहमदाबाद – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुतणी सोनल मोदी यांनी अहमदाबाद
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडून उमेदवारी मागितलेली
आहे. भाजपची कार्यकर्ती म्हणून आपल्याला अहमदाबादमधील बोडकदेव या महिलांसाठी
राखीव वॉर्डमधून उमेदवारी हवी असल्याचे सोनल मोदी यांनी जाहीरपणे सांगितले आहे.
आपण उमेदवारीसाठीचे सर्व निकष पूर्ण करत असून पंतप्रधानांची पुतणी म्हणून नव्हे तर
कार्यरर्ती म्हणून उमेदवारी मागत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
वयाने तिशीत असलेल्या सोनल या गृहिणी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाऊ प्रल्हाद
मोदी यांच्या त्या कन्या आहेत. प्रल्हाद मोदी हे रास्त भावातील धान्य दुकान चालवतात आणि
गुजरातमधील रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत. दुसरीकडे आगामी
महापालिका निवडणुकीत पक्षातील नेते किंवा कार्यकर्त्यांच्या नातेवाईकांचा उमेदवारी देताना
विचार केला जाणार नसल्याचे भाजपच्या गुजरात शाखेने नुकतेच जाहीर केलेले आहे.
सोनल मोदी म्हणतात, बोडकदेव या महिला राखीव वॉर्डातून मी उमेदवारी मागितलेली आहे.
मी पूर्वी भाजपची सक्रीय कार्यकर्ती होते. मुले लहान असल्याने मी ब्रेक घेतला होता. मात्र आता
मुले मोठी झाली आहेत. त्यामुळे जनतेसाठी वेळ देण्याचे मी ठरवले आहे. त्यामुळेच
निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे मी ठरवले आहे. निवडणूक लढवण्यासाठी पक्षाची
उमेदवारी मिळण्यासाठी मी पात्र आहे. पक्षाने उमेदवारीसाठी काही निकष निश्चित केले असले
तरी माझा विश्वास आहे की, मी ते निकष पूर्ण करते.
त्या म्हणतात, भाजपने मला तिकीट दिले नाही तरी मी एक समर्पित कार्यकर्ती म्हणून पक्षात
सक्रीय राहणार आहे. दरम्यान, प्रल्हाद मोदी यांनी निवडणूक लढवण्याच्या मुलीच्या निर्णयाला
पाठिंबा व्यक्त केला आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य त्यांचा निर्णय घेण्यास मोकळे आहेत असे ते
म्हणाले आहेत.
ते पुढे म्हणतात, ही काही घराणेशाही नाही. स्वतःच्या फायद्यासाठी आम्ही नरेंद्र मोदींच्या
नावाचा कधीही वापर केलेला नाही. आम्ही आमच्या चरितार्थासाठी कष्ट करून पैसे कमावतो.
मी देखील रास्त धान्य दुकान चालवतो. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मी कधी त्यांच्या
बंगल्यावर त्यांना भेटायला गेलेलो नाही. भाजपच्या गुजरातमधील संसदीय मंडळाने महापालिकेसाठी उमेदवार निश्चित करण्याचे काम सुरु केले असून 1 फेब्रुवारी रोजी संसदीय मंडळाने जाहीर केले आहे की, पक्षाच्या नेत्यांच्या नातेवाईकांना निवडणुकीत उमेदवारी देण्यात येणार नाही.
त्याचबरोबर नगरसेवक म्हणून तीन वेळा संधी मिळालेल्यांना तसेच साठ वर्षावरील व्यक्तीला पक्षाची उमेदवारी मिळणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. अहमदाबाद महापालिकेसाठी 21 फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून राज्यातील 81 नगरपालिका, 31 जिल्हा परिषदा आणि 231 पंचायत समित्यांसाठी 28 फेब्रुवारीला मतदान होणार आहे.