Ayodhya – पंतप्रधान नरेंद्र मोदी (narendra modi) हे ३० डिसेंबर रोजी अयोध्या येथे रोड शो करणार असून त्या दिवशी त्यांची तेथे जाहीर सभाही होणार आहे. अयोध्येचे आयुक्त गौरव दयाल यांनी या अनुषंगाने अयोध्येतील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, उच्च दर्जाच्या सेवांसाठी आम्ही येथून लखनौपर्यंत बॅकअप प्लॅन ठेवणार आहोत.
पंतप्रधान ३० डिसेंबरला येणार आहेत, विमानतळ आणि रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्यचे मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. अंदाजानुसार, 22 जानेवारीनंतर दररोज अंदाजे ५० ते ५५ हजार लोक अयोध्येत येतील आणि प्रशासन त्याच्या तयारीत व्यस्त आहे.
पंतप्रधान अयोध्येतून सोडल्या जाणाऱ्या रेल्वेला हिरवा झेंडा दाखवतील. त्यानंतर पंतप्रधान विमानतळाशेजारील मैदानावर जाहीर सभेला संबोधित करतील. ते विमानतळ ते रेल्वे स्थानकापर्यंत प्रवास करतील, हा प्रवास रोड शोच्या स्वरूपात असेल. त्यांच्या स्वागताची व्यवस्था केली जात आहे, असेही ते म्हणाले.
“मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे की २१ आणि २२ जानेवारीला भक्तांसाठी रामलल्लाचे दर्शन होणार नाही, सर्वसामान्य भाविकांसाठी २३ जानेवारीपासून दर्शन सुरू होईल.आयुक्त म्हणाले की, चार्टर्ड विमानाने अनेक पाहुणे येतील असा अंदाज आहे, त्यामुळे प्रयागराज, गोरखपूर, वाराणसी यांसारख्या जिल्ह्यांमध्ये सर्व विमाने तिथे उभी करण्याची व्यवस्था केली जाऊ शकते.