भाजीपाल्याचे दर कडाडले

हेळगाव -करोना संकटाने हैराण झालेल्या नागरिकांना आता भाजीपाल्यांच्या कडाडलेल्या दराचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होताना दिसत आहेत.

काही दिवसांपूर्वी कांद्याने डोळ्यात पाणी आणले असून आज रोजी कांदा पन्नास रुपये प्रति किलोच्या घरात गेला आहे. कांद्यापाठोपाठ बटाटा, वांगी, टोमॅटो, गवारी हा नित्यनियमाने लागणारा भाजीपालाही सरासरी प्रति किलो 50 ते 60 रुपयांच्या आसपास पोहोचल्याने नव्याने निर्माण झालेल्या संकटात सर्वसामान्यां बरोबरच गृहिणींचे देखील आर्थिक बजेट कोलमडले आहे. याशिवाय दररोज कोणती भाजी करायची हाच विचार सध्या गृहिणींना सतावत आहे.

करोनाच गंभीर संकट गेली काही महिने उभे आहे. त्यामुळे भाजीपाला बहुतांशी शेतकरी वर्गाने करण्यात कुचराई केली. याशिवाय ज्यांनी भाजीपाला केला त्यांना गेल्या आठवड्यापासून वेगळ्या वातावरणाचा सामना करावा लागत आहे. कधी ऊन, कधी पाऊस, कधी धुकं तर कधी अति उष्णता, अशा प्रकारे सतत बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम पिकावर होऊन उत्पन्नात घट होत आहे. मुळातच आवक कमी असल्याने भाजीपाल्यांचे दरात मोठी वाढ झाली आहे.

याशिवाय कडधान्यांचेही दर वाढल्याने गृहिणींसमोर रोजच्या भाजीचा प्रश्‍न उद्‌भवत आहे. अनेकांच्या करोनाकाळात नोकऱ्या गेल्याने संसाराचा गाडा चालवायचा कसा हाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.