सातारा – जिल्ह्यातील सहा तालुक्यांतील 37 गावांमध्ये लंपी स्किन आजाराचा प्रादुर्भाव झाला असून सहा जनावरांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. 37 गावांमधील 158 जनावरांना लंपी स्किनची बाधा झाली असून 60 जनावरांवर उपचार करुन ती बरी झाली आहेत. 56 हजार 900 जनावरांचे लसीकरण करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
वाघेरी (ता. कराड) येथे लंपी स्किनची सुरुवात झाली. कराड, फलटण तालुक्यानंतर सातारा तालुक्यात महिगाव, पांढरवाडी येथे बाधित जनावरे आढळली. वाघेरी, फलटण तालुक्यात खामगाव, जिंती, फडतरवाडी, चव्हाणवाडी, पाडेगाव, सोनवडी, कुरवली बुद्रुक, धुळदेव, फरांदवाडी, आसू, हनुमंतवाडी, गिरवी, डोंबाळवाडी, सातारा तालुक्यात कोडोली (पांढरवाडी), महागाव, खटाव तालुक्यात अनपटवाडी,
मानेवाडी, मोराळे, धोंडेवाडी, राजापूर, खटाव, कलेढोण, कटगुण, गणेशवाडी औंध, निमसोड, पडळ आदी ठिकाणी 158 बाधित जनावरे आढळून आली आहेत. लंपी स्किनच्या पार्श्वभूमीवर बाधित क्षेत्राच्या पाच किलोमीटर परिसरातील 194 गावांमधील जनावरांचे प्राधान्याने लसीकरण करण्यात येत असून लसीचा साठा शिल्लक असल्याचे डॉ. शिंदे यांनी सांगितले.