बेल्हे – वडगाव आनंद (ता. जुन्नर) येथील गोमाता सहकारी दूध उत्पादक संस्थेच्या वतीने गवळीबांधव व सभासदांच्या पशुधनाचे मोफत लम्पी या आजारांवरील लसीकरण करण्यात आले, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक गडगे यांनी दिली.
याप्रसंगी सुरेश गडगे, राहुल खोकले, गणेश देवकर, विलास गडगे, राजाराम भुजबळ, गोपाळ फुलसुंदर, रेश्मा चौगुले, सविता शिंदे, रामदास वाळुंज, सचिव अभिषेक कोकाटे आदी मान्यवर ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रसंगी डॉ. विजय देवकर यांच्या गोठ्यातील पशुधनास डॉ. सिद्धार्थ गाडगे, डॉ. हर्षल हाडवळे, डॉ. संजय घंगाळे यांनी लसीकरण केले.
डॉ. महेश शेजाळ म्हणाले, लम्पी या रोगाची बाधा म्हैस, गाय तसेच बैल या सर्व जनावरांना होते. विशेष करुन याची बाधा लहान वासरांना मोठ्या प्रमाणावर होत आहे. तसेच देशी जनावरांपेक्षा संकरित जनावरे या विषाणूला अधिक बळी पडत आहेत. पशुपालकांनी घाबरून न जाता लम्पीसदृश लक्षणे आढळल्यास आपल्या गावात असलेल्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडुन करण्यात आले आहे.
“जनावरांच्या अंगावर दोन ते पाच सेंटीमीटर व्यासाच्या गाठी येतात तसेच जनावरांचे दूध उत्पादन घटते. ताप येऊन डोळे व नाकातून चिकट स्राव येऊन त्यांची भूक मंदावते. ही लक्षणे लम्पी रोगाची असून यासाठी जनावरांचे लसीकरण करून घ्यावे.”
-डॉ. श्रीरंग बढे, पशुवैद्यकीय अधिकारी