कोयनानगर – कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. त्यामुळे एक फुटावर स्थिर ठेवण्यात आलेले धरणाचे दरवाजे गुरूवारी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास साडेचार फुटांवर ठेवण्यात आले आहेत. कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरले असून धरणात 105.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. नदीपात्रात 41,281 क्युसेक पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे कोयना नदीवरील मुळगाव येथील फरशी पुलाला पाणी टेकले आहे.
धरण पाणलोट क्षेत्रातील सर्वदूर ठिकाणी गेल्या 24 तासांत अचानक पावसाचा जोर वाढला आहे. कोयनानगर 62 मिलिमीटर, नवजा येथे 61 मिलिमीटर तर महाबळेश्वर येथे 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. पाणलोट क्षेत्रात दिवसभर पावसाचा जोर कायमच असल्याने धरणात येणाऱ्या पाण्याची आवक 40115 क्युसेक आहे. त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात एक टीएमसी वाढ होऊन धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे.
दिवसभरात पाणलोट क्षेत्रात झालेली पावसाची नोंद पुढीलप्रमाणे आहे. (पहिला आकडा दिवसभरातील पाऊस व कंसातील आकडा आजपर्यंतचा एकूण पाऊस मिलिमीटरमध्ये) कोयनानगर 41 (4382), नवजा 59 (5338) तर महाबळेश्वर येथे 36 (5708). धरणाची जलपातळी 2163.04 फूट झाली असून धरणात 105.03 टीएमसी पाणीसाठा झाला आहे.