जळोची : बारामतीत आज शरद पवारांनी लागोपाठ तीन मेळावे घेतले. खरेतर त्यांचे आज नियोजित चार मेळावे होते, पण अचानक बारामतीतील व्यापाऱ्यांनी त्यांचा नियोजित मेळावा रद्द केला, तशा स्वरूपाचे पत्र शरद पवार यांना दिले. त्यावरून शरद पवार हे वकिलांच्या मेळाव्यात बोलले.
शरद पवार म्हणाले, गेल्या पन्नास वर्षात असं कधी घडलं नव्हतं. मला माहित नाही, बारामतीतील व्यापाऱ्यांना कशाची चिंता वाटते, मात्र बारामतीतील व्यापाऱ्यांचे प्रश्न मी सोडवतो. आज व्यापाऱ्यांबरोबर चर्चा होती. मात्र अचानक मला व्यापाऱ्यांचा मेळावा रद्द करण्यात आल्याचे पत्र मिळाले.
गेल्या पन्नास वर्षात मला कधी असे कळवले नव्हते, परंतु बारामतीतील व्यापाऱ्यांनी मला मीटिंग घेणे शक्य नाही असे कळवले. त्यांना बहुदा कोणतीतरी चिंता वाटत असावी कारण कार्यक्रम घेण्यापेक्षा तो न घेतलेला बरा असे त्यांना वाटले.
त्यांनी समोरच्याचे ऐकूनही घ्यायचे नाही असे ठरवले, त्याची मला खंत वाटते. शरद पवार यांनी वकिलांचे मेळाव्यात ही माहिती दिली मात्र त्यानंतर सगळीकडेच या रद्द झालेल्या मेळाव्याची आणि शरद पवार यांच्या वक्तव्याची चर्चा सुरू झाली.
दरम्यान बारामतीत आज शरद पवार यांचे नियोजित चार मेळावे होते. त्यामध्ये होलार समाज मेळावा, बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा, बारामती, दौंड व इंदापूर तालुक्यातील वकिलांचा मेळावा आणि बारामतीतील वैद्यकीय व्यवसायिकांचा मेळावा अशा चार मेळाव्यांपैकी बारामतीतील व्यापाऱ्यांचा मेळावा अचानक रद्द करण्यात आला.