मंचर -घोडेगाव व मंचर पोलीस ठाण्यांच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यासाठी विविध ठिकाणी तपासणी नाके सुरू आहेत. चेक नाक्यांमुळे बाहेरून येणाऱ्या नागरिकांवर प्रतिबंध बसला असल्याची माहिती मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी दिली.
घोडेगाव, पालखेवाडी, चिंचोली (कोकणे), तळेघर, डिंभे, तिरपाड, कळंब, पेठ, कारफाटा, शिंगवे फाटा, रोडेवाडी फाटा, लोणी, शिरदाळे इत्यादी ठिकाणी वाहनांची कसून चौकशी केली जात आहे.
या नाक्यांवर बंदोबस्तासाठी वन कर्मचारी, कृषी विभाग, महसूल, पोलीस पाटील, शिक्षण व पोलीस विभागाचे कर्मचारी या ठिकाणी आठ तासांच्या तीन शिफ्टमध्ये काम करत आहे. तपासणी नाक्यांवर येणारे नागरिक व वाहनांची सखोल माहिती घेतली जात आहे.
नाक्यावर येणाऱ्या वाहनाचा प्रकार, क्रमांक, चालकाचे नाव, वय, पत्ता, मोबाइल क्रमांक, सहप्रवासी संख्या, त्यांची नावे, कोणत्या कारणासाठी बाहेर आला आहात आदि बाबींची माहिती ऑनलाइन भरली जात आहे.