मुंबई – भारताची चालू खात्यावरील तूट वाढली असतानाच शेअर बाजारातून परदेशी गुंतवणूक परत जात असल्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव कायम आहे. शुक्रवारी भारतीय रुपयाचा दर 57 पैशांनी कोसळून 76.92 प्रती डॉलर या पातळीवर गेला.
आयात करणाऱ्याकडून डॉलरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्याचबरोबर आयातीचा खर्च वाढत असल्यामुळे भारताकडील परकीय चलन साठा वेगाने कमी होत आहे. अशा परिस्थितीमध्ये रुपयाचे मूल्य कमी होत असल्याचे दिसून येत आहे. रिझर्व बॅंकेने परवा केलेल्या व्याज दरवाढीमुळे रुपयाचे मूल्य स्थिर होण्यास काही प्रमाणात मदत मिळण्याची शक्यता आहे.
एकीकडे रुपया कोसळत असताना जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे दर शुक्रवारी 2.20 टक्क्यांनी वाढून 113 डॉलरवर गेले आहेत. भारत आपल्या गरजेच्या 80 टक्के कच्चे तेल आयात करतो. यासाठी भारताला मोठ्या प्रमाणात परकीय चलन खर्च करावे लागत आहे. त्यामुळे रुपयाच्या मूल्यावर दबाव येत आहे. यासाठी भारत स्वस्तात रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्यासाठी वाटाघाटी करीत आहे.