पुणे – पुणे शहरातील पवन मावळ भागातील असलेल्या नवीन वाघेश्वर मंदिरात श्री विष्णुची मूर्ती इतिहास अभ्यासकांना आढळली आहे. अडीच फूट उभी आणि आडवी साडे चार फूट लांब असणारी मूर्ती येथील मंदिराच्या भिंतीमध्ये लावण्यात आली आहे. भगवान श्री विष्णुची प्राचीन, अतिशय सुंदर आणि रेखीव मूर्ती मावळ भागात पहिल्यांदाच आढळल्याने इतिहास अभ्यासकांसाठी ही मोठी पर्वणीच ठरली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हा प्राचीन वास्तूंनी समृद्ध आहे. येथील लेण्या तसेच गडकिल्ले हा ऐतिहासिक वारसा अनमोल ठेवींपैकी एक आहे. ऐतिहासिक मावळच्या भूमीत अनेक गडकिल्ले, लेण्या, प्राचीन मंदिरे, वाडे, तलावे, विहिरी, बारव, वीरगळी, समाधी व त्याचबरोबर इतर प्राचीन वास्तू आहेत. ह्या सर्व वास्तू पाषाणात व पाषानापासून कोरल्या व बनवलेल्या आहेत. या वास्तूंबरोबरच वाघेश्वर येथे इतिहास अभ्यासकांना आढळलेली भगवान श्री विष्णुची प्राचीन मूर्ती खरोखरच अतिशय देखणी व सुंदर आहे. ही मूर्ती बाराव्या शतकातील आहे. वामकुक्षी अवस्थेत ही मूर्ती आहे. पूर्वी शैव व वैष्णव असे दोन सांप्रदाय होते. शैव सांप्रादायाचे भगवान शंकर तर वैष्णव सांप्रादायाचे श्री विष्णू आराध्य दैवत आहेत. दोन्ही सांप्रादाय मिळून हिंदू धर्म झाला.
1972 साली पवना धरणाची निर्मिती झाली. ही मूर्ती पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या जुन्या वाघेश्वर मंदिरात होती. 1982 साली हे नवीन मंदिर बांधून त्यात ही मूर्ती आणली, असे येथील पुजाऱ्याने सांगितलं.
जुन्या वाघेश्वराच्या मंदिरात श्री विष्णुची मूर्ती असूच शकत नाही. श्री विष्णुच्या मूर्तीचे मंदिर वेगळं असू शकत आणि ती मूर्ती जुन्या मंदिरात ठेवली असावी आणि त्यानंतर ती मूर्ती नवीन वाघेश्वर मंदिरात आणली असावी अशी शक्यता आहे.
– प्रमोद बोऱ्हाडे, इतिहास संशोधक