पुणे – जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आता सात सदस्यांची वाढ होणार आहे. या सदस्य संख्या वाढीत जुन्नर, खेड आणि इंदापूर तालुक्यांत झेडपीचे कारभारी वाढणार आहेत. तसेच पंचायत समितीच्या गणांमध्ये नवीन 14 सदस्य समितीत प्रवेश करणार आहेत. वाढीव झेडपी सदस्यांमुळे तीन तालुक्यांत बऱ्यापैकी बंडखोरीला चाप बसणार आहे. यातून जिल्ह्यातील प्रबळ आणि प्रस्थापित राष्ट्रवादीला पोषक वातावरण निर्माण होणार आहे.
जिल्ह्यातील 22 गावे पुणे महापालिकेत समावेश झाली. यानंतर माळेगाव, देहूगाव, मावळ या नगरपंचायती झाल्या. त्यामुळे जिल्हा परिषदेची सदस्य संख्या घटणार हे निश्चित झाले होते. याचा सर्वाधिक फटका हवेली तालुक्याला बसला आहे. हवेलीतील संख्या घटली आहे. बारामती तालुक्यात माळेगावची नगरपंचायत झाल्यानंतर तेथील पवार- तावरे गटातील लढत नगरपंचायतीत विलीन
झाली आहे.
राज्य शासनाने जिल्हा परिषदेचे गट आणि पंचायत समिती गण यांच्या संख्येमध्ये वाढ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयासंदर्भातील अध्यादेश जारी झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यातील गटांची संख्या निश्चित करण्यात आली. राज्यात सर्वाधिक सदस्य संख्या नगरपाठोपाठ पुणे जिल्हा परिषदेत आहेत. ही संख्या 82 आहे.
मावळत्या सभागृहात 75 सदस्य होते, जुन्नर, इंदापूर, दौंड आणि खेड तालुक्यांत सदस्य वाढले असून, शिरूर, मावळ, मुळशी, दौंड, पुरंदर, भोर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक सदस्य वाढला आहे. शिरूर, मावळ, मुळशी, दौंड, पुरंदरल भोर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक सदस्य वाढल्याने इच्छुकांनी तयारी केली आहे.
इंदापूर, दौंडमध्ये विरोधकांकडून तुल्यबळ लढत?
पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली एकहाती सत्ता आहे. जिल्हा परिषदेतून मंत्रालयात जाणारा हा राजमार्ग यापूर्वी अनेक पदाधिकाऱ्यांनी निवडला आहे. यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचा समावेश आहे. विधानसभेची समीकरणे जुळविणारी झेडपीची निवडणूक यावेळी अटीतटीची होणार आहे. यात राष्ट्रवादी – कॉंग्रेस- शिवसेना हे महाविकास आघाडीतील घटक पक्ष निवडणूक लढणार काय, हे चित्र स्पष्ट झाले आहे.
गेल्या सहा महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीबाबत स्थानिक पातळीवर निवडणूक रणनीती, आघाडीचे निर्णय घ्यावेत, अशी सूचक सूचना केली होती. त्यामुळे पुणे जिल्हा परिषदेत उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाविकास आघाडीतील घटक पक्षांना सोबत घेऊन निवडणूक लढवणार काय, याची चर्चा रंगली आहे. एकंदरीत इंदापूर तालुक्यातील प्रस्थापित, बलाढ्य नेते हर्षवर्धन पाटील हे तयारीनिशी मैदानात उतरणार आहेत. तसेच गतवेळी दौंडचे आमदार राहुल कुल यांना झेडपी निवडणुकीत यश पदरात पडले नव्हते. यावेळी तेही तुल्यबळ लढत देतील, अशी चिन्हे आहेत.