वॉशिंग्टन : अमेरिकेने भारताला ऍस्ट्रा झेनकाची लस आणि अन्य आवश्यक ती वैद्यकीय सामग्री त्वरित पोहोचवली पाहिजे असा दबाव अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्यावर सध्या चारही बाजूने आला आहे. अमेरिकेतील विविध क्षेत्रातील चेंबर ऑफ कॉमर्सच्या संस्था, अमेरिकेचे संसद सदस्य आणि अमेरिकेतील भारतीय अशा सर्व गटांकडून बायडेन यांच्यावर हा दबाव आला आहे.
अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सने म्हटले आहे की, आज अमेरिकेकडे ऍस्ट्रा झेनकाचे लक्षावधी डोस पडून आहेत. अन्यही जीवनावश्यक औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. ही सामग्री भारत आणि ब्राझील तसेच अन्य गरजू देशांना त्वरित पुरवली गेली पाहिजे. त्या संस्थेचे अध्यक्ष मॅरोन ब्रिलियंटे यांनी म्हटले आहे की, ज्या करोना डोसेसची अमेरिकेला गरज नाही ते डोस अमेरिकेने अन्य गरजू देशांना त्वरित पोहोचवले पाहिजेत. अमेरिकेत लसीचे उत्पादन करण्याची पुरेशी क्षमता आहे आणि येत्या जूनपर्यंत प्रत्येक अमेरिकन नागरिकाला लस पुरवण्याइतके उत्पादन जर अमेरिका करू शकत आहे तर त्यांनी या लसीचा साठा करून ठेवण्याची गरज नाही. त्यातून अमेरिकेच्या नेतृत्वावर सर्वमान्यतेचे शिक्कामोर्तब होईल. जगाचे नेतृत्व आपल्याकडे घ्यायचे असेल तर जगाला मदतही आपण केली पाहिजे, असे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमेरिकेच्या विदेश विभागाच्या उपप्रवक्त्या जलिना पोर्टर यांनी पत्रकारांना सांगितले की, भारताला गरजेच्या वैद्यकीय सामग्रीच्या पुरवठ्याबाबत आम्ही भारताशी समन्वय साधून काम करीत आहोत. भारताच्या कोविड स्थितीची साऱ्या जगाला चिंता आहे, असेही त्यांनी नमूद केले. बायडेन यांच्या निवडणूक प्रचार सभेचे एक प्रमुख सूत्रधार शेखर नरसिंहन यांनी म्हटले आहे की, मानवतावादी भूमिकेतून भारताला आपण मदत केली पाहिजे. या संबंधात बायडेन यांनी पंतप्रधान मोदींशी चर्चा केली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले आहे.