हास्य कलाकार व्होलोदिमीर झेलेन्स्की युक्रेनचे अध्यक्ष

कीव (युक्रेन) – हास्य कलाकार व्होलोदिमीर झेलेन्स्की यांची युक्रेनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणूकीत झेलेन्स्की यांना प्रचंड मताधिक्‍य प्राप्त झाले आहे. मतमोजणी जवळजवळ पूर्ण झाल्यावर त्यांना तब्बल 73 टक्क्‌यांपेक्षा जास्त मते मिळाली आहेत तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि मावळते अध्यक्ष पेट्रो पोरोशेंको यांच्या खात्यात जवळजवळ 24 टक्केच मते होती.

2014 पासून राष्ट्राध्यक्षपदी असलेले पोरोशेंको यांनी आपला पराभव मान्य केला आहे. पण मी राजकारण सोडणार नाही, असं ते राजधानी कीवमध्ये आपल्या समर्थकांशी बोलताना म्हणाले. तीन आठवड्यांपूर्वी मतदानाच्या पहिल्या टप्प्यात ते सर्वांत आघाडीवर होते. त्यावेळी 39 उमेदवार मैदानात होते.

झेलेन्स्की पुढची पाच वर्षं युक्रेनचे अध्यक्षपदी राहतील. 2014च्या आधी रशियाला पाठिंबा देणाऱ्या अध्यक्षांविरोधात युक्रेनमध्ये मोठी आंदोलने झाली होती. त्यानंतर उद्योजक आणि अब्जावधींची संपत्ती असलेले पेरोशेंको राष्ट्राध्यक्ष झाले.
या निवडणुकीचे एक्‍झिट पोल जाहीर झाल्यानंतर पेरोशेंको यांनी देशात अनिश्‍चितता येणार असल्याचे भाकित केले होते.
41 वर्षांचे व्होलोदिमीर झेलेन्स्की राजकीय नर्मविनोदी नाटकातील अभिनयासाठी प्रसिद्ध आहेत. ‘सर्व्हंट ऑफ द पीपल’ नावाच्या या मालिकेत ते एक पात्र साकारतात, जे अपघातानं अचानक युक्रेनच्या अध्यक्षपदी विराजमान होते.
त्यांनी आपल्या शोच्याच नावावर बनवलेल्या राजकीय पक्षाकडूनच अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती.
झेलेन्स्की यांच्याकडे कुठलाही राजकीय अनुभव नाही. आपण इतर उमेदवारांपेक्षा कसे वेगळे आहोत, हेच त्यांनी प्रचारादरम्यान जनतेला पटवून दिले.

कुठलीही ठोस रणनीती किंवा इतर गोष्टी त्यांनी आपल्या निवडणूक प्रचारात समोर आणल्या नाहीत. तरीसुद्धा त्यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानात 30 टक्क्‌यांहून अधिक मतं मिळवली. तेव्हा दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या पेरोशेंको यांना 15.95 टक्के मतं मिळाली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.