शिवशाहीच्या भाडे कपातीमुळे तोट्यात दिवसेंदिवस वाढ

पुणे – खासगी बसेसच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एसटी महामंडळाने स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला आहे. प्रवासी आकर्षित करण्यासाठी महामंडळाने “शिवशाही’ बसेसच्या भाड्यामध्ये मोठी कपात केली आहे. त्यामुळे प्रशासनाचा तोटा दिवसेंदिवस वाढत आहे.

खासगी बसेसच्या चालकांनी प्रवाशांना दर्जेदार सेवा देण्यासोबतच तिकीटाच्या दरातही फारशी वाढ केलेली नाही. मात्र, सुट्ट्यांच्या कालावधीत त्यांच्याकडून भाड्यामध्ये वाढ करण्यात येते. असे असले तरी प्रवाशांना त्याचा फारसा फरक पडत नाही. त्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची या बसेसना पसंती मिळत आहे. परिणामी एसटीच्या बसेसचा प्रवासी कमी होत आहे. त्याचा परिणाम महामंडळाच्या महसुलावर होत असून तोटा दिवसेंदिवस वाढत आहे. हाच तोटा तब्बल 19 हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचला आहे.

त्याची दखल घेत महामंडळानेही आपल्या ताफ्यातील शिवशाही या बसेसचे भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार गेल्या तीन ते चार महिन्यांपासून या बसेसचे भाडे दोनशे ते अडीचशे रुपयांनी कमी झाले आहे. तरीही या बसेसच्या प्रवाशांमध्ये अपेक्षित वाढ झालेली नाही. असे असले तरी संबंधित बसेसला लागणाऱ्या इंधनाच्या आणि अन्य स्पेअरपार्टसच्या खर्चात कपात झालेली नाही. त्यामुळे हा तोटा आणखीनच वाढत आहे. आगामी काळात महामंडळाच्या वतीने त्यावर उपाययोजना न झाल्यास आणखी फटका बसण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. यासंदर्भात महामंडळाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांच्याशी संपर्क साधला असता प्रतिक्रियेसाठी ते उपलब्ध होऊ शकले नाहीत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.