कोलकाता – प. बंगालच्या ममता बॅनर्जी सरकारमधील एका मंत्र्याने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याबाबत अत्यंत आक्षेपार्ह विधान केल्यामुळे तृणमूल कॉंग्रेसवर चौफेर टीका सुरू आहे. स्वत: मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचीही या विषयामुळे पुरती कोंडी झाली असून त्यांनी आता त्यांच्या पक्षाचे मंत्री अखिल गिरी यांच्या विधानाबाबत माफी मागितली आहे.
राष्ट्रपती मुर्मू या खूप चांगल्या महिला आहेत. त्यांच्या बाबत मंत्र्याने केलेल्या विधानाची मी निंदा करते आणि माफी मागते. अखिल गिरी यांनी जे केले ते पूर्णपणे चुकीचे होते व भविष्यात पुन्हा असा प्रकार घडला तर कारवाई केली जाईल, असे ममता यांनी म्हटले आहे.
राष्ट्रपतींबाबत आक्षेपार्ह टिप्पणी करताना अखिल गिरी म्हणाले होते की कोणाच्या दिसण्यावरून अथवा चेहऱ्यावरून आम्ही त्याचे मुल्यांकन करत नाही. आम्ही राष्ट्रपती पदाच्या खुर्चिचा सन्मान करतो. आपल्या राष्ट्रपती कशा दिसतात? त्यांचा हा 17 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता व त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली होती. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली असून अखिल गिरी यांनी त्याच दिवशी माफीही मागितली आहे.
दरम्यान, गिरी यांच्या विरोधात कोलकाता उच्च न्यायालयात एक जनहित याचिकाही दाखल करण्यात आली आहे. सर्वोच्च घटनात्मक पदाचा अवमान केल्याबद्दल त्यांना शिक्षा करण्यात यावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
दरम्यान, यापूर्वी या विषयावरून ममतांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. जर कोणी चूक केली असेल तर त्याला आपली चूक सुधारण्याची संधी दिली पाहिजे. जर कोणी भ्रष्टाचारात दोषी आढळले तर कायदा त्याला शिक्षा करण्याचे काम करेल. मात्र प्रसारमाध्यमांच्या माध्यामातूनच खटले चालवले जात आहेत असे त्या म्हणाल्या होत्या.