पुणे – ग्वाल्हेर येथे स्पर्धेसाठी गेले असता प्रॅक्टिस करताना घोड्याची धडक बसून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील जवानाला वीरमरण आले आहे. सुधीर पंढरीनाथ थोरात (वय 32) असे अपघातात मृत्यू पावलेल्या जवानाचे नाव आहे.
थोरात हे भारतीय सैन्यात सीमा सुरक्षा दलात (बीएसएफ) कार्यरत होते. रविवारी (दि. 13) घोड्याने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर मंगळवार (दि. 15) रोजी सकाळी 8 वाजता आंबेगाव तालुक्यातील लौकी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा यश (वय अडीच वर्ष), आई-वडिल असा परिवार आहे. थोरात यांच्या मृत्यूमुळे आंबेगाव तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
सुधीर थोरात हे बीएसएफ दलातील पट्टीचे घोडेस्वार होते. अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकाची पदके जिंकली आहेत. आंतरराष्ट्रीय स्पर्धांसह देशांतर्गत स्पर्धांमध्येही त्यांनी अनेक पदके जिंकली आहेत. त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबासह तालुक्यावर शोककळा पसरली आहे.