स्वारगेट-कात्रज मेट्रो भुयारी मार्ग; महापौर, उपमहापौरांची स्वाक्षरी
पुणे – स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या भुयारी मार्गाचा प्रस्ताव महापौर, उपमहापौर, अन्य पदाधिकारी आणि गटनेत्यांच्या स्वाक्षरीने “महामेट्रो’कडे पाठवण्याची तयारी महापालिका प्रशासनाने केली आहे. केंद्राच्या अंदाजपत्रकातील नियोजित निधीच्या तरतुदीच्या अनुषंगाने हा प्रस्ताव “महामेट्रो’कडे पाठवणे आवश्यक असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्राच्या वार्षिक अर्थसंकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे हा प्रस्ताव “महामेट्रो’ मार्फत पुढे केंद्राकडे जाणे आवश्यक आहे. त्यामुळे तरतूद झाल्यास पुढील वर्षासाठी प्रकल्प निधी उभा राहू शकतो, या दृष्टीने पदाधिकारी आणि पक्षनेत्यांच्या स्वाक्षरी घेणे महत्त्वाचे असल्याने प्रशासनाने हे पाऊल उचलले आहे.
वास्तविक हा प्रस्ताव मार्च महिन्याच्या मुख्यसभेच्या कार्यपत्रिकेवर आहे. मात्र, करोनाच्या प्रादुर्भावामुळे सभा होत नसल्याने हा विषय मंजुरीविना पडून आहे. मात्र, सद्यपरिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर होऊन महामेट्रोमार्फत पुढे जाणे आवश्यक आहे. मुख्यसभा मान्यता देईल, या भरवशावर प्रस्ताव पुढे पाठविण्यात येत आहे.
एकूण खर्च 4283 कोटी…
या प्रकल्पासाठी एकूण 4283 कोटी रुपये इतका खर्च येणार आहे. यामध्ये केंद्रसरकार 584 कोटी रुपये, राज्यसरकार 584 कोटी रुपये, पुणे महापालिका 233 कोटी रुपये जमिनीची किंमत, असा सहभाग आहे. यासाठी 2381 कोटी रुपये कर्जही घेण्यात येणार आहे.