नवी दिल्ली – भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेतील अखेरचा टप्पा जवळ आला असून, या यानावरील “विक्रम लॅंडर’ आज संध्याकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करेल. यावेळी अखेरची 20 मिनिटे साऱ्या देशवासीयांचा श्वास रोखला जाईल, कारण या 20 मिनिटात “चांद्रयान-3′ मोहिमेचे यशापयश अवलंबून असेल.
भारताचे चांद्रयान-3 चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ प्रज्ञान रोव्हरसह विक्रम लॅंडरच्या सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करून इतिहास रचण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या शेवटच्या 20 मिनिटांच्या प्रवासातील रोमांचक क्षणांचे वर्णन 20 मिनिटांच्या एखाद्या टी-20 सामन्याच्या रोमहर्षक समाप्तीसारखे असू शकते.
इस्रोच्या म्हणण्यानुसार, लॅंडिंगच्या नियोजित वेळेच्या 2 तास आधी “विक्रम लॅंडर’चे लॅंडिंग करायचे की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाईल. अखेरच्या 20 मिनिटात “विक्रम लॅंडर’ चंद्राच्या पृष्ठभागावर उतरवण्यात काही समस्या निर्माण झाल्यास लॅंडिंगचा दुसरा पर्यायही तयार ठेवण्यात आला आहे. जर सर्व काही ठीक झाले तर लॅंडिंग 23 ऑगस्टलाच होईल. तसे न झाल्यास 27 ऑगस्ट रोजी लॅंडिंगचा दुसरा पर्याय तयार होईल. लॅंडर आणि चंद्राची स्थिती लक्षात घेऊन शास्त्रज्ञ तारीख बदलण्याचा निर्णय घेतील. 14 जुलै रोजी नेत्रदीपक लिफ्ट ऑफ केल्यानंतर, इस्रोच्या बाहुबली रॉकेटने चांद्रयान-3 पृथ्वीच्या कक्षेत ठेवला.
चांद्रयान-3 ने पृथ्वीच्या अनेक फेऱ्या मारल्या आणि वेग वाढवला. 1 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान पुढे ढकलले गेले. चंद्राच्या दिशेने 3.84 लाख किलोमीटरचा एकाकी प्रवास करत 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयानने चंद्राच्या कक्षेत हळूहळू प्रवेश केला. 17 ऑगस्ट 2023 रोजी विक्रम लॅंडर आणि प्रज्ञान रोव्हरपासून प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे करणे ही एक महत्त्वाची पायरी होती, जेव्हा उपग्रह 153 किमी बाय 163 किमीच्या कक्षेत होता. लवकरच विक्रम लॅंडर चंद्राच्या पृष्ठभागाच्या जवळ असलेल्या लंबवर्तुळाकार कक्षेत प्रवेश केला. त्यानंतर लॅंडिंगची तयारी केली गेली आहे.
चुकांमधून घेतला धडा…
अंतराळ तज्ज्ञ आर. सी. कपूर यांनी सांगितले की, चांद्रयान-2 च्या चुकांमधून इस्रोने धडा घेतला आहे. यावेळी अल्गोरिदम कार्यशील ठेवण्यात आला आहे आणि लॅंडरची लॅग यंत्रणा पूर्वीपेक्षा अधिक मजबूत करण्यात आली आहे. ‘चांद्रयान-3 च्या लॅंडरची रचना अशा प्रकारे करण्यात आली आहे की ते लॅंडिंगच्या वेळी 3 मीटर प्रति सेकंदाच्या वेगाने देखील उभे राहू शकते. यासोबतच त्याचे वजनही पूर्वीच्या तुलनेत 250 ग्रॅमने वाढले आहे. त्यात अतिरिक्त इंधन आहे, त्यामुळे लॅंडर चंद्रावर उतरवण्यात कोणतीही अडचण येऊ नये.