राज्य परीक्षा परिषद : नियोजनास यंदा महिनाभर उशीर
शिष्यवृत्ती परीक्षा 16 फेब्रुवारीला
इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षा 16 फेब्रुवारीला होणार आहे. इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा (एनटीएस) 3 नोव्हेंबरला होणार आहे. इयत्ता आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (एनएमएमएस) 8 डिसेंबरला घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डेहराडूनच्या राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज प्रवेश परीक्षा (आरआयएमसी) 1 व 2 जून, 1 व 2 डिसेंबरला घेण्यात येणार आहेत. या संभाव्य वेळापत्रकावर राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांनी शिक्कामोर्तबही केले आहे.
पुणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे सन 2019-20 या वर्षातील विविध परीक्षांचे संभाव्य वेळापत्रक अखेर तयार झाले आहे. या वर्षी वेळापत्रक तयार करण्यासाठी एक महिना उशीरही झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या महत्वाच्या परीक्षा हा राज्य परीक्षा परिषदेमार्फतच घेण्याला शासनाकडून पूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. परीक्षा फी ची रक्कम ही परिषदेच्या तिजोरीच जमा होत असते.
दरवर्षी एप्रिलमध्ये वर्षभरातील परीक्षांचे नियोजन तयार करुन ठेवण्यात येते. यंदा मात्र लोकसभा निवडणूकीच्या कामकाजात अधिकारी व्यस्त असल्याने वेळापत्रक मुदतीत तयार होऊ शकले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. शिष्यवृत्ती, व्यावसायिक, विभागीय व बाह्य असा चार विभागात वर्षभरातील परीक्षा घेण्यात येणार आहेत.
यंदा 7 ते 17 जून व 26 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत डी.एल.एड. व डी.टी.एड. या परीक्षा घेण्यात येणार आहेत. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 22 सप्टेंबरला होणार आहे. वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा 24 ते 28 जुलै, 17 ते 23 जुलै, शासकीय संगणक टायपिंग परीक्षा 29 जुलै ते 3 ऑगस्ट, 7 ते 22 जानेवारी या कालावधीत होणार आहेत. टिचर्स सर्टीफीकेट फॉर अँग्लो इंडियनची परीक्षा 15 त 23 एप्रिल दरम्यान होणार आहे.
विभागीय परीक्षाअंतर्गत लिपिकांसाठी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा, सहायक शिक्षण उपनिरीक्षकांसाठी सेवा प्रवेशोत्तर परीक्षा, पर्यवेक्षकांसाठी अर्हता परीक्षा आवश्यकतेनुसार डिसेंबरमध्ये होणार आहेत. 26 मे 2014 च्या शासन निर्णयानुसार शासनाचे भूतपूर्व दुय्यम पदांच्या सेवा निवडमंडळाच्या कक्षेतील गट क व ड संवर्गाच्या सरळसेवेने भरतीच्या लेखी परीक्षेसाठी जिल्हास्तरीय निवड समित्या, प्रादेशिक स्तरीय तथा राज्यस्तरीय निवड समित्यांना राज्य परीक्षा परिषदेचे सहाय्य घेता येईल, असे स्पष्ट करण्यात आले आहेत.