प्रभात वृत्तसेवा पुणे, दि. 25 -अखिल मंडई मंडळाचा 129 वा गणेशोत्सव यंदा उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. रंगीबेरंगी आरसे आणि झुंबराने सजलेल्या भव्य स्वप्नमहालात हलत्या झोपाळ्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत.
गणेश चतुर्थीला दि. 31 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे. मंगळवार पेठेतील श्री स्वामी समर्थ मठाचे प्रमुख प्रतापकाका अनंत गोगावले आणि त्यांच्या पत्नी अपर्णा यांच्या हस्ते प्रतिष्ठापना होणार आहे. अविनाश कुलकर्णी गुरुजी यांच्या पौरोहित्याखाली हा सोहळा होईल, अशी माहिती अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात यांनी दिली.
गणेशोत्सवाच्या 10 दिवसांत विविध धार्मिक कार्यक्रम आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 6 वाजल्यापासून प्रात:पूजा, आरती, गणेशयाग, सायंपूजा आणि संध्याकाळी 7.30 वाजता महाआरती होणार आहे.
संपूर्ण महाराष्ट्रातून शारदा गजाननाचे दर्शन घेण्यासाठी गणेशभक्त येतात. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मंडळाच्या वतीने विशेष काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी उत्सव मंडप परिसरात 30 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार असून, बाऊन्सर आणि 200 सुरक्षा स्वयंसेवक काम करणार आहेत, अशी माहिती थोरात यांनी दिली.
गणरायाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना एक वही आणि पेन देण्याचे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. वह्या आणि पेन जमा करून पुणे आणि पुण्याबाहेरील गरजू विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहेत. हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देणारा “बंधुभाव पुरस्कार’ वितरण सोहळा उत्सवकाळात होणार असल्याचे थोरात यांनी सांगितले.
असा असेल स्वप्नमहाल
महिरपामध्ये सजलेले दिवे, मोराची भव्य कमान, रंगीबेरंगी आरशांनी चकाकणारी सजावट आणि 20 भव्य झुंबराने बाप्पांचा स्वप्नमहाल सजणार आहे. या महालात काल्पनिक वृक्षाला हलता झोपाळा लावण्यात येणार असून, त्यावर शारदा गजानन विराजमान होणार आहेत. 32 बाय 16 फूट असा भव्य झोपाळा असणार आहे. स्वप्नमहालात खांब वगळून विविध कलाकृती साकारण्यात आल्या आहेत. विशाल ताजणेकर यांनी या महालाचे कला दिग्दर्शन केले आहे.