पिंपरी -शहरातील शाळा मंगळवारपासून (दि. 1) सुरू होत आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळांमध्ये साफसफाई, सॅनिटायझेशन आदी तयारी पूर्ण करण्यात आली आहे. ऑनलाइन शिक्षणाला कंटाळलेल्या विद्यार्थ्यांना “ऑफलाइन’ शिक्षणाचा आनंद घेता येणार आहे.
करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने राज्य सरकारने निर्बंध लागू केले. पर्यायाने, शाळा देखील बंद ठेवण्यात आल्या होत्या. दरम्यान, 24 तारखेपासून राज्यभरात शाळा उघडण्याचे आदेश देण्यात आले. तथापि, स्थानिक पातळीवर करोनाची रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार स्थानिक प्रशासनाला देण्यात आले. त्यानुसार पिंपरी-चिंचवड शहरात आठवडाभरासाठी शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला होता.
दरम्यान, मंगळवारपासून पहिली ते आठवीचे वर्ग अर्ध सत्र कालावधीत तर, नववी ते बारावीचे वर्ग नियमित उघडण्यासाठी आयुक्त राजेश पाटील यांनी परवानगी दिली आहे. त्यानुसार मंगळवारी शाळा सुरू होत आहेत. महापालिका व खासगी शाळांमध्ये त्यासाठी आज साफसफाई व अन्य तयारी सुरू होती. महापालिका शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक यांची ऑनलाइन बैठक मंगळवारी घेण्यात आली. या बैठकीत आयुक्त राजेश पाटील, प्राथमिक शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी स्मिता गौड सहभागी झाल्या होत्या.