पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे डिसेंबरमध्ये प्रथम व द्वितीय वर्ष बॅकलॉग विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येणार आहे. अंतिम वर्ष परीक्षा घेताना तांत्रिक अडचणी आल्या त्यात सुधारणा करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने परीक्षेचे नियोजन करण्यात येणार आहे.
तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अंतिम वर्ष ऑनलाइन परीक्षा देता आल्या नाहीत. त्यामुळे विद्यापीठाला फेरपरीक्षा घ्यावी लागली. परंतु, प्राध्यापकांकडून तयार करून घेतलेल्या प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या फॉटमध्ये असल्याने तांत्रिक अडचणी आल्याचे निदर्शनास आले होते.
परिणामी, विद्यापीठाला परीक्षा घेताना आणि विद्यार्थ्यांना परीक्षा देताना नाहक त्रास सहन करावा लागला. दरम्यान, बॅकलॉग परीक्षाही ऑनलाइन पद्धतीने होणार आहे. त्यासाठी काही सॉफ्टवेअर तयार केले आहेत. परीक्षेसाठी विद्यापीठाच्या लॉगइनमध्येच प्राध्यापकांकडून प्रश्नपत्रिका तयार करून घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे तांत्रिक अडचणी येणार नसल्याचे विद्यापीठाचे म्हणणे आहे.
दरम्यान, एजन्सीच्या सहकार्याने परीक्षा घेतल्या जातील. त्यामुळे एजन्सीला अपेक्षित असलेल्या सिस्टीममध्ये प्रश्नपत्रिका स्वीकारल्या जातील. पूर्वी त्या कनव्हर्ट करताना तांत्रिक चुका होत होत्या. तसे होऊ नये या दृष्टीने योग्य तीन खबरदारी घेण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
50 टक्केच विद्यार्थ्यांची फेरपरीक्षेस उपस्थिती
तांत्रिक अडचणींमुळे अंतिम वर्ष परीक्षा न देऊ शकलेल्या विद्यार्थ्यांची फेरपरीक्षा शनिवारी संपली. एकूण अर्ज केलेल्यांपैकी 50 टक्के विद्यार्थ्यांनीच ती दिली. अंतिम वर्ष परीक्षेत अडचणी आलेल्या सुमारे 32 हजार विद्यार्थ्यांनी गुगल फॉर्म भरून दिले होते. त्यावर विद्यापीठातर्फे 5 ते 7 नोव्हेंबर या कालावधीत संबंधित विद्यार्थ्यांच्या फेरपरीक्षांचे आयोजन केले होते.
दरम्यान, तांत्रिक कारणांमुळे परीक्षा न देऊ शकलेल्या काही विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेसाठी विद्यापीठाकडून लॉगइन आयडी उपलब्ध झाला नाही, अशा तक्रारी समोर येत आहेत. मात्र, ऑनलाइन सिस्टिममध्ये ज्या विद्यार्थ्यांना खरेच परीक्षा देता आली नाही, अशाच विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षेसाठी संधी उपलब्ध करून देण्यात आली, असा दावा विद्यापीठाकडून केला जात आहे.