वडगाव मावळ, (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मावळ विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची प्राथमिक तयारी पूर्ण झाल्याची माहिती मावळचे उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले व तहसीलदार विक्रम देशमुख यांनी दिली.
निवडणूक आयोगाकडून निवडणुकीच्या तारखा लवकरच घोषित होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने मावळ विधानसभा मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून तयारीची लगबग सुरू आहे. मावळ विधानसभा मतदारसंघात एक लाख ८८ हजार पुरुष, एक लाख ७८ हजार ८५५ महिला व १२ इतर असे एकूण तीन लाख ६७ हजार ७७९ मतदार आहेत. गेल्या (२०१९) लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी ३० हजार १२२ मतदार वाढले आहेत. तालुक्यात ३८१ मूळ व नऊ ठिकाणी सहायक मतदान केंद्रे तयार करण्यात आल्याने मतदान केंद्रांची एकूण संख्या ३९० झाली आहेत.
मावळ लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पीएमआरडीएचे अतिरिक्त महानगर आयुक्त दीपक सिंगला यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी सुरेंद्र नवले हे काम पाहणार आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पथके तयार करण्यात आली असून, त्यात सहा भरारी पथकांचा समावेश आहे.
सहा चेकपोस्टही तयार करण्यात आलेल्या आहेत. दहा ते बारा मतदार केंद्रांसाठी एक याप्रमाणे एकूण ४५ क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मंगळवारी प्रांत नवले व तहसीलदार देशमुख यांच्या उपस्थितीत मावळ पंचायत समितीच्या सभागृहात सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे निवडणूक पूर्व तयारीचे प्रशिक्षण घेण्यात आले.
निवडणुकीसाठी अडीच हजार कर्मचारी
मावळ तालुक्यात निवडणूक कामासाठी सुमारे अडीच हजार कर्मचारी लागणार असून, त्यांची तजवीजही करण्यात आली आहे. त्यांना ऑर्डर काढणे केवळ बाकी आहे. मतदारांच्या मदतीसाठी तहसील कार्यालयात वोटर हेल्पलाइन कक्ष स्थापन करण्यात आला आहे. मावळ विधानसभा मतदारसंघासाठी ईव्हीएम मशिनसाठी स्ट्रॉगरूम तळेगाव दाभाडे येथील नूतन महाराष्ट्र कॉलेज येथे निश्चित करण्यात आली आहे.
जनजागृतीसाठी ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिके
नागरिकांमध्ये निवडणूक मतदानाविषयी जनजागृती होण्यासाठी गावोगावी प्रत्यक्षात एलईडी स्क्रीनवर ईव्हीएम व व्हीव्हीपॅट प्रात्यक्षिक दाखविण्यातयेत आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांच्या सहभागाने गावोगावी जनजागृती फेरी काढण्यात येत आहे.
पथनाट्य सादर केली जात आहेत. जास्तीतजास्त मतदान व्हावे यासाठी मतदारांनी मतदारयादीमध्ये आपले नाव समाविष्ट आहे किंवा नाही याची खात्री करावी. त्यासाठी निवडणूक आयोगाने वोटर हेल्पलाइन अॅप सुरू केले आहे. हे अॅप प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे.