पौड (वार्ताहर) – 25 वर्षीय गरोदर प्रेयसीवर गंभीर वार झालेल्या अवस्थेत ती गाडीतून उतरून पळून गेल्याने प्रियकराने पळ काढला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरूणीला पौड पोलीस स्टेशनचे हवालादार संतोष दावलकर आणि दीपक पालके यांनी तातडीने पुणे येथील ससून रूग्णालयत दाखल केले. ही तरूणी वाचली असली तरी तिच्या पोटातील बाळाचा मात्र मृत्यू झाला आहे.
याप्रकरणी संशयित आरोपी विनायक चिंतामणी सूर्यवंशी (वय 34, रा. थेरगाव पुणे) याला पौड पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. पौड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी विनायक चिंतामणी सूर्यवंशी आणि जखमी पंचवीस तरूणी पुणे येथे एकत्र कामाला होते. त्यात त्यांची ओळख झाली. यानंतर ही तरूणी मुंबई येथे कामानिमित्त गेली.
विनायक तिला शनिवारी (दि. 13) रात्री पुण्याला घेऊन निघाला. विनायकने तिला रविवारी (दि. 14) पहाटे जीवे ठार मारण्याचे उद्देशाने चाकूने भोकसून मानेवर, छातीवर, खांद्यावर, पोटात गंभीर जखमी केले. तो तिला तशाच अवस्थेत दिवसभर गाडीत फिरवत होता. रविवारी रात्री आठच्या दरम्यान विनायक पौडजवळील सिम्बॉयसिस कॉलेजजवळ मारण्याच्या उद्देशाने गाडी थांबवली असता तरूणीने या गाडीतून पळ काढला.
पुढे काही अंतरावर जाऊन ती बेशुद्ध झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या या तरूणीला सुरूवातीला नागरिकांनी पौड ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलीस हवालदार संतोष दावलकर आणि दीपक पालके यांनी लवळे येथील सिम्बॉयसिस हॉस्पीटल येथे दाखल केले. मात्र रक्तस्त्राव जास्त झाल्याने तिला अखेर ससून रूग्णालयात हलविण्यात आले.
या तरूणीचे मूल पोटातच मरण पावले. ही तरूणी शुद्धीवर आल्यानंतर सोमवारी रात्री उशिरा पौड पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली. घटनेचे गांभीर्य ओळखून हवेलीचे उपअधीक्षक भाऊसाहेब ढोले पाटील, पोलीस निरीक्षक मनोज यादव यांनी ससून येथे जाऊन या तरूणीच्या तब्यतेची विचारपूस केली.
आरोपीचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे टीमने मदत केली असून पौड पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव, हवालदार रॉकी देवकाते, पोलीस नाईक ईश्वर काळे, हवालदार संतोष दावलकर, पोलीस नाईक दत्तात्रय अर्जुन यांनी आरोपीला शिताफीने अटक केली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक सुधीर कदम करीत आहेत.